नाशिक (Nashik) : येथील ओझर विमानतळ गेले बारा दिवसांपासून दुरुस्तीच्या कारणासाठी बंद होते. ते विमानतळ ४ डिसेंबरपासून पूर्ववत सुरू होणार असल्याने नाशिक ते दिल्ली व नाशिक ते हैदराबाद या विमानसेवा रविवार (दि.४) पासून सुरू होणार आहे. दरम्यान स्पाईसजेट वगळत इतर विमान कंपन्यांची सेवा ठप्प आहे.
उडाण योजनेचा कालावधी संपल्यामुळे विमान कंपन्यांनी नाशिकहुन हवाई उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मागील महिन्यात अनेक राजकीय प्रत्यारोप झाले. यामुळे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन नाशिकमधील विमानसेवा बंद होऊ देणार नाही. क्रेंदीय उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी बोलणे झाले असून ते उडान योजनेचा कोरोना काळातील खंडित कालावधी विमान कंपन्यांना वाढवून देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. दरम्यान नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबल यांनीही केंद्रीय उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना याबाबत पत्र पाठवले होते. या पत्राला मंत्री शिंदे यांनी उत्तर पाठवून नवीन वर्षात स्टार एअर या कंपनीची ३ फेब्रुवारीपासून नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू होणार असल्याचे कळवले होते. तसेच नाशिक- बेळगाव या विमानसेवेचे बुकिंगही सुरू झाले आहे.
उडान योजनेचा कालावधी संपल्यानंतर नाशिकच्या ओझर विमानतळावरील विमानसेवा बंद करण्याचा निर्णय संबंधित विमा कंपन्यांनी घेतला आहे. यामुळे ओझरविमानतळावरून सुरू असलेल्या विमानसेवा विस्कळित झाली आहे.उडान योजना संपल्यानंतर तीन वर्षांनी संबंधीत कंपन्यांनी व्यावसायिक पद्धतीने विमानसेवा चालवावी, असे केंद्र सरकारला अपेक्षित असले, तरी या योजनेचा कालावधी वाढवून मिळावा यासाठी विमान कंपन्या आडपडद्याने सरकारवर दबाव आणत असल्याचेही चित्र निर्माण होत आहे. याचा परिणाम म्हणजे अनेक वर्षे विमानतळ बांधूनही विमानसेवा सुरू नसलेल्या ओझरविमानतळावरील सेवा पुन्हा विस्कळीत झाली. दरम्यान नाशिक दिल्ली व नाशिक हैदराबाद ही विमानसेवा सुरू होती. मात्र, देखभाल दुरुस्तीसाठी विमानतळ मधल्या १३ दिवस बंद होते. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर ही विमानसेवा पुन्हा सुरू होणार आहे. स्टार एअरची बेळगाव विमानसेवा दिवाळीच्या दरम्यान बंद झाली असून ती फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार आहे. अलायन्स एअरची दिल्ली, अहमदाबाद, नाशिक-पुणे-बेळगाव या सेवा बंद पडल्या आहेत. यामुळे नाशिकच्या प्रवाशांना विमानसेवेसाठी शिर्डी अथवा मुंबईच्या विमानतळांचा आधार घ्यावा लागत आहे.