नाशिक (Nashik) : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे (सारथीचे) नाशिक येथे उभारण्यात येणाऱ्या केंद्रासाठी राज्य सरकारने आणखी ०.५० हेक्टर म्हणजे ५००० चौरस मीटर जागा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे सारथी प्रशिक्षण केंद्रासाठी आता ११,००० चौरस मीटर जागा उपलब्ध झाली असून, या जागेवर १५९ कोटी रुपयांच्या निधीतून सारथीची बारा मजली इमारत उभी राहणार आहे.
या ठिकाणी यापूर्वी २२ मजली इमारत उभारून त्यात प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची उभारणी करण्याचे ठरवण्यात आले होते. आता पुरेसी जागा उपलब्ध झाल्याने त्या इमारतीच्या आराखड्यात बदल होणार आहे.
पुण्याच्या धर्तीवर राज्यातील सर्वच महसूली विभागांमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सारथीचे कार्यालय उभारण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नाशिक विभागातील सारधीच्या केंद्रासाठी नाशिक शहरात नाशिक पंचायत समितीच्या आवारातील ६००० चौरस मीटर जागा सरकारने मंजूर केली आहे.
या जागेवर २२ मजली इमारत उभारून तेथे प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका, वसतीगृह आदी सुविधा उभारून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारतीचा आराखडाही तयार केला आहे. मागील वर्षी नाशिक दौऱ्यावर आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना या इमारतीचे सादरीकरणही करण्यात आले होते.
दरम्यान, या सारथी केंद्रासाठी ६००० हजार चौरस मीटर ही जागा कमी पडत असल्याने या जागेशेजारी असलेल्या सरकारी भूखंडातून अर्धा हेक्टर म्हणजे पाच हजार चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे यांनी केली होती, त्यानुसार सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणे येथे मिळणाऱ्या शिक्षण, प्रशिक्षण, अभ्यासिका, वसतीगृहासह सर्व सुविधां उत्तर महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना नाशिक शहरात उपलब्ध होणार आहे.
सारथी केंद्रासाठी वाढीव पाच हजार चौरस मीटर जागा उपलब्ध झाल्यामुळे आता सारथी इमारतीच्या आराखड्यातही बदल केले जाणार आहेत. यामुळे आता ही इमारत २२ मजल्यांऐवजी १२ मजल्यांची होणार आहे. या इमारतीचा नवीन आराखडा तयार झाल्यानंतर त्याला तांत्रिक मान्यता देऊन टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे. या इमारतीसाठी समाज कल्याण विभागाने १५९ कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे.