नाशिक (Nashik) : नाशिक रोड येथी मागील सहा वर्षांपासून रखडलेल्या कोठारी नाट्यगृह उभारण्यातील अडचणी दूर होण्यास सुरवात झाली आहे. या नाट्यगृहाचे बांधकाम सहा वर्षांपासून रखडल्यामुळे त्याच्या खर्चात वाढ होऊन तो ३५ कोटी रुपये झाला आहे.
या बांधकामाचा ५० टक्के खर्च उचलण्यास राज्य सरकारने तयारी दर्शवली आहे. एवढेच नाही, तर त्यातील ५ कोटी रुपये महापालिकेकडे वर्ग करण्यास मंजुरी मिळाली आहे. यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले जात असतानाच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच पाच कोटी रुपये मंजूर केल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
नाशिक महापालिकेने नाशिकरोडच्या बिटको चौकातून जेल रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भूखंडावर ७२० आसनव्यवस्था असलेले कै. कोठारी नाट्यगृह उभारण्यास सहा वर्षांपूर्वी मंजुरी दिली होती. त्यावेळी नाट्यगृह तयार करण्यासाठी अठरा कोटी रुपये खर्चास मंजुरी देण्यात येऊन त्यासाठी पाच कोटींची तरतूदही करण्यात आली होती. भाजपचे तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक संभाजी मोरुसकर यांनी राज्य सरकारने या नाट्यगृहाचा भार उचलावा, यासाठी पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकारने नाट्यगृह उभारण्यास येणाऱ्या खर्चाचा निम्मा भार उचलण्याची तयारी दर्शविली.
दरम्यान या नाट्यगृह उभारण्यास त्या जागेवरील झाडांचा अडथळा आला. अखेर महापालिकेने तेथील चंदनाच्या झाडांचे पुनर्रोपन केले. पण या सर्व बाबींमुळे बांधकाम सुरू होऊ शकले नाही. यामुळे नाट्यगृह उभारणीसाठी ठेकेदाराला देण्यात आलेल्या कार्यारंभ आदेशाची मुदतही संपुष्टात आली. आता या कामाची किंमत ३५ कोटींवर गेली आहे. या रखडलेल्या नाट्यगृहाची उभारणीचा विषय पुन्हा समोर आल्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांनी स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत पुरवणी मागण्यांमध्ये या निधी देण्याचा प्रस्ताव दिला. त्याला मंजुरी मिळून राज्य सरकारने पाच कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
दरम्यान कोठारी नाट्यगृहासाठी राज्य शासनाने ५० टक्के निधी देण्याचे मान्य केल्यानंतर पहिल्या टप्प्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच कोटी रुपये मंजूर केल्याचा दावा भाजपाचे माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी केला आहे. त्यावेळी तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांनी या प्रश्नी पाठपुरावा केला होता. आता नवीन निधी मंजूर झाला की त्यावेळचाच निधी पुन्हा मंजूर झाला, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.