नाशिक (Nashik) : महापालिकेतर्फे (NMC) लवकरच जवळपास ७०४ पदांची भरती (Recruitment) केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या संस्थेमार्फतच राबवली जाणार आहे.
टाटा कन्सलटन्सीसोबत कराराच्या अंतिम मसुद्याला महापालिका प्रशासनाने अंतिम मंजुरी दिली असून, ही प्रक्रिया पुढच्या दहा दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या भरती प्रक्रियेला वेग येणार आहे. ही भरती प्रक्रिया मागील वर्षी डिसेंबरमध्ये राबवण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, शासनाच्या सूचनेनुसार भरती प्रक्रिया राबवण्यासाठी संस्था नियुक्तीची प्रक्रिया अद्याप सुरू असल्यामुळे ही भरती लांबणीवर पडली आहे.
नाशिक शहराची लोकसंख्या २० लाखापार झाली असून, महापालिका हद्दीत असलेल्या जवळपास २२ खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे. विस्तार वाढत असल्यामुळे सुविधा पुरविताना यंत्रणेवर ताण येतो. महापालिकेला किमान १४ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज आहे. तसा आकृतिबंधही शासनाकडे पाठवण्यात आला आहे. प्रत्यक्षात, पालिकेला मात्र 'क' वर्ग आकृतिबंधानुसार कामकाज करावे लागत आहे. त्यानुसार ७०८२ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात साडेचार हजार अधिकारी व कर्मचारीच कार्यरत आहेत.
नाशिक महापालिकेच्या आस्थापनेवर सात हजार ८२ पदे मंजूर आहेत. त्यातील २८०० पदे विविध कारणांमुळे रिक्त झाली आहेत. त्यामुळे महापालिकेला कामकाज करताना अडचणी येतात. कामकाजावर त्याचा परिणाम होतो.
कोरोना पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीची बाब म्हणून वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ७०४ पदांची भरती करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, नोकर भरती करताना टीसीएस किंवा आयबीपीएस या संस्थांमार्फतच भरती करावी, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
महापालिकेने सुरवातीला आयबीपीएस संस्थेने प्रस्ताव दिला होता. मात्र, आयबीपीएस संस्था व महापालिका प्रशासनात अटी व शर्तीवरून मतभेद निर्माण झाल्याने महापालिकेने टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसशी संपर्क साधला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी टीसीएस संस्थेच्या प्रतिनिधीसोबत चर्चा केली व कराराचा अंतिम मसुदा तयार केला आहे. या करार मसुद्याला मान्यता मिळाली असून, पुढील आठवड्यात करारनाम्यावर स्वाक्षरी होईल. त्याअनुषंगाने पुढील तीन वर्षांसाठी टीसीएस कंपनीकडे भरतीचे सर्वाधिकार राहतील.