नाशिक (Nashik) : महापालिका हद्दीतील पेठरोडचा (Peth Road) साडेसहा किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. जवळपास अडीच ते तीन किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहने तसेच इतर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्ता खराब असल्याने अपघाताचे (Accident) प्रमाण वाढले आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत झाल्यामुळे स्मार्टसिटीच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न फसला आहे. या मार्गाचे कॉंक्रिटीकरणासाठी महापालिकेकडे निधी नसल्यामुळे आता सिंहस्थ कुंभमेळा विकास निधीतूनच या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण होऊ शकणार असल्याने महापालिकेने तुर्त दोन कोटी ३० लाख रुपये खर्च करून या रस्त्याची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याबाबतची टेंडर प्रक्रियाही आदर्श आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली आहे. आता फेब्रुवारीतच या रस्त्याच्या दुरुस्तीबाबचे टेंडर पूर्ण होऊन दुरुस्ती होऊ शकणार आहे.
नाशिक ते पेठ या रस्त्याचा सहा किलोमीटर भाग नाशिक महापालिकेच्या हद्दीत आहे. या हद्दीच्या पलिकडील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण झालेले आहे. यामुळे तो रस्ता उत्तम असताना वाहनांनी नाशिक महापालिका हद्दीत प्रवेश केल्यानंतर खाचखळगे व खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्याचा अनुभव येतो. शहरात असलेल्या या भागातच वाहनांची वर्दळ अधिक आहे. मात्र, खड्डे चुकवण्याच्या नादात या रस्त्यावर सतत अपघात होत असतात. यामुळे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी रुंदीकरण व्हावे, यासाठी या भागातील नागरिकांना आक्रमक भूमिका घेतली.
यामुळे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी महापालिकेकेने या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने या रस्त्यासाठी निधी उपलब्ध नसून त्याची दुरुस्ती करण्याची तयारी महापालिकेने दर्शवली.
दरम्यान ॲड. ढिकले यांनी स्मार्ट सिटी कंपनीकडे या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला. स्मार्ट सिटी कंपनीने याबाबत महासभेचा ठराव असल्यास साडेचार किलोमीटर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्याची तयारी दर्शवली. या रस्त्याच्या साडेचार किलोमीटर कॉंक्रिटीकरणसाठी ७१ कोटी रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला.
त्यानंतर आमदार ॲड. ढिकले यांनी प्रशासकांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम स्मार्टसिटी कंपनीकडून करण्याचा महासभेवर ठराव मंजूर करून घेतला. त्यानंतर तो प्रस्ताव स्मार्टसिटी कंपनीकडे पाठवला. यामुळे पेठरोडचे किमान साडेचार किलोमीटरचे कॉंक्रिटीकरण होणार असल्याचे नागरिकांना समाधान होते. दरम्यान स्मार्टसिटी कंपनीने मंजूर केलेल्या कामांची मुदत ३१ मार्च २०२३ ला संपणार असल्याने त्यांना नवीन कामे मंजूर करण्यास परवानगी नाही. यामुळे या रस्त्याचे काम स्मार्ट सिटी कंपनीला करण्यास अडचणी आल्या.
त्यावर आमदार ढिकले यांनी कंपनीने ७१ कोटी रुपये निधी महापालिकेला हस्तांतरित करावा, यासाठी प्रयत्न केले. मात्र, सध्या स्मार्टसिटी कंपनीकडे असलेला निधी हा प्रत्येक कामनिहाय मंजूर केलेला आहे. यामुळे या रस्त्यासाठी निधी देता येणार नाही, अशी भूमिका स्मार्ट सिटी कंपनीने घेतली. यामुळे स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून पेठरोडचे कॉंक्रिटीकरण होण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला.
दरम्यान, महापालिकेच्या बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठी तयार केलेल्या आराखड्यानुसार सुरुवातील निश्चित करण्यात आलेली ७१ कोटी रुपयांची किंमत आता वाढून ती ८६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. आधीच महापालिकेचे उत्पन्न घटले असून पुढच्या वर्षाचे अंदाजपत्रकात घट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे महापालिकेच्या उत्पन्नातून या साडेसहा किलोमीटरच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण होणे अवघड दिसत आहे. यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या विकास आराखड्यातच या कामाचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असे दिसत आहे.
यामुळे तुर्तास महापालिकेच्या बांधकाम विभागाने २.३० कोटी रुपयांच्या निधीतून या रस्त्याची डागडुजी करण्याचा मार्ग काढला आहे. मात्र, या डागडुजी कामाचे टेंडरही आचारसंहितत अडकले असल्याने फेब्रुवारीमध्येच ती प्रक्रिया पूर्ण होऊन त्यानंतरच या कामास सुरवात होण्याची चिन्हे दिसत आहेत.