नाशिक (Nashik) : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbhmela) निमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा सिंहस्थ आराखड्यात समावेश केला जातो. त्यातून नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या पर्यटन विकासासाठी अनेक महत्वपूर्ण प्रश्नही मार्गी लावले जातात. या कुंभमेळ्यात नाशिक शहराभोवती ६० किलोमीटर लांबीचा बाह्यरिंगरोडचे (Outer Ring Road) काम मार्गी लावण्याबाबत महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान या रिंगरोडची उभारणी महापालिकेच्या आवाक्याबाहेरील असल्याने तो बाह्यरिंगरोड महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाकडून उभारला जाणार आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू असून प्राथमिक माहितीनुसार या रिंगरोडच्या उभारणीसाठी दहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यासाठीचा खर्च टोल आकारणीतून वसूल केला जाणार आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७-२८ या वर्षात सिंहस्थ कुंभमेळा होणार असून, कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी समिती गठित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार समितीही स्थापन करण्यात आली आहे. या समितीने नाशिकच्या सिंहस्थासाठी साधुग्रमसाठी भूसंपादनासह साठ किलोमीटरच्या बाह्य रिंगरोडचा प्रस्ताव प्राधान्याने तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्याचप्रमाणे आराखडयात बांधकाम विभागाने पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करावा, मिळकत विभागाने आवश्यक भूसंपादन, वैद्यकीय व आरोग्य विभागाने सेवा करण्याच्या सूचना यापूर्वीच करण्यात आल्या आहेत.
नाशिक शहरातून मुंबई आग्रा हायवे जातो. तसेच नाशिक-पुणे, नाशिक बलसाड आदी मार्गांवरून येणारी वाहने मुंबई, आग्रा या दिशेने अथवा पुणे, शिर्डीकडे जायचे असले, तरी त्यांना नाशिक शहरातून जावे लागते. यामुळे नाशिक शहरात सतत वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत असतो. यामुळे नाशिक शहराच्या बाहेरून येणाऱ्या वाहनांना शहराच्या पलीकडे जाण्यासाठी बाह्य रिंगरोडचे नियोजन करण्यात आले आहे.
हा बाह्य रिंगरोड साधारण ६० किमी लांबीचा होणार असून तयार केलेल्या आराखड्यात रस्त्याची रुंदी काही ठिकाणी 36 मीटर आहे, तर काही ठिकाणी ६० मीटर आहे. दरम्यान संपूर्ण रिंगरोडची सरसकट रुंदी ६० मीटर करण्याचे नियोजन सुरू आहे.
या बाह्यरिंगरोडमुळे बाहेरून येणारी वाहने शहरात येऊन गर्दी करण्यापेक्षा बाहेरच्या मार्गाने जाणार आहेत. त्यामुळे या रिंगरोडमुळे भविष्यात शहरातील वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळयातही त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांना तसेच शहरात येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे नियोजनही या रिंगरोडच्या माध्यमातून करता येऊ शकते.
त्यामुळे सिंहस्थाच्या गर्दीचा भार नाशिक शहरात पडणार नाही. महापालिकेने यापूर्वीच या रिंगरोडसाठी भूसंपादन करताना वाढीव टीडीआर मिळावा, अशी मागणी शासनाकडे प्रस्ताव पाठवून करण्यात आली आहे.
अद्याप यासंदर्भात शासनाकडून त्यावर निर्णय झालेला नसून लवकरच टीडीआरचा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान सिंहस्थाच्या तयारीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी बाह्यरिंगरोडचे काम एमएसआरसीडीच्या माध्यमातून करण्यात येईल, असे जाहीर केले असून त्यांनी संबंधितांना याबाबतचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
यानसार नियोजन केले जात असतानाच बाह्यरिंगरोडची एकूण किंमत दह हजार कोटींच्या आसपास जाणार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हा खर्च या रिंगरोडवर टोल आकरणी करून वसूल केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रस्तावित बाह्य रिंगरोड
- बिटको विहितगाव-देवळाली रोड
- नांदूर नाका ते जत्रा हॉटेल ते लिंक रोड
- सातपूर - अंबड लिंक रोड
- गंगापूर - सातपूर लिंक रोड