नाशिक (Nashik) : सीबीएस ते कॅनडा कॉर्नर आणि कॅनडा कॉर्नर ते जुना गंगापूर नाका दरम्यानच्या प्रस्तावित मॉडेल रोडची (Model Road) अंदाजपत्रकीय रक्कम २५ कोटी रुपये असताना महापालिकेच्या बांधकाम विभागाने यावर्षाच्या अंदाजपत्रकात (Budget) त्यासाठी केवळ दोन कोटींची तरदूत केली आहे.
अंदाजपत्रकात पुरेसा निधी नसताना हा रस्ता मंजूर झाल्यास महापालिकेवर दायीत्वाचा बोजा वाढू शकतो, यामुळे महापालिकेच्या लेखा विभागाने या मॉडेल रोडला आक्षेप घेतला आहे. तसेच आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची मान्यता असेल तरच रोडच्या कामाला मंजुरी देऊ, अशी भूमिका घेतली आहे. यामुळे हा मॉडेल रोड अडचणीत सापडला आहे. दरम्यान बांधकाम विभागाने या रस्त्यासाठी आयुक्तांची फेरमान्यता घेण्यासाठी प्रस्ताव मांडण्याची तयारी सुरू केली आहे.
नाशिक महापालिकेच्या २०२३-२४ या वर्षाच्या अंदाजपत्रकानुसार नवीन रस्ते या लेखाशीर्षाखाली १०० कोटी बांधकाम विभागाकडे आले. या शंभर कोटींच्या निधीतून शहरातील अनेक मोठ्या रस्त्यांचा समावेश आहे. तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन नवीन रस्त्यांसाठी पूर्ण निधीची तरतूद करण्याऐवजी टोकन पद्धत सुरू केली. शहरातील कामांसाठी लेखाशीर्षानिहाय निधी देण्याऐवजी निव्वळ रस्ते, पूल असे हेड करून निधीची तरतूद केली गेली.
त्यानुसार सीबीएस ते कॅनडा कॉर्नर आणि कॅनडा कॉर्नर ते गंगापूर नाका या काटकोनातील मॉडेल रोडचा खर्च २५ कोटींच्या आसपास असताना केवळ दोन कोटींची टोकन तरतूद करण्यात आली. मात्र, लेखा विभागाने या तरतुदींवरआक्षेप घेत आयुक्तांची मंजुरी असेल तरच काम धरू, असे स्पष्ट केल्याने हा रस्ता आता अडचणीत आला आहे.
इतर रस्तेही अडचणीत?
लेखा विभागाच्या आक्षेपानंतर बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी पुन्हा आयुक्तांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवला जाणार आहे. त्यामुळे या मॉडेल रस्त्याबाबत नवीन आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.अंदाजपत्रकात मॉडेल रोडसह अनेक रस्त्यांसाठी टोकन रक्कम धरली आहे.
यामुळे या रस्त्यांबाबतचे प्रस्ताव येतील, त्यावेळेस लेखा विभागाकडून आक्षेप येऊ शकतात. यामुळे या टोकन पद्धतीने निधीची तरतूद करण्याच्या पद्धतीबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे.