Nashik News नाशिक : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर महापालिका प्रशासनाने सिंहस्थ कुंभमेळा विकास आराखडा मार्गी लावण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी पंचवटीत गंगाघाट, श्री काळाराम मंदिर परिसराची अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी २००३ मध्ये कुंभमेळ्यात झालेली चेंगराचेंगरीची दुर्घटना लक्षात घेऊन श्री काळाराम मंदिर ते सरदार चौक या दरम्यानचा जुना शाही मार्ग १२ मीटर रुंद करण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी पाहणी केली.
कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीची चौकशी केलेल्या रमणी आयोगाने हा मार्ग ३० मीटर रुंदीकरण करण्याची शिफारस केली असली, तरी महापालिकेकडून १२ मीटरपर्यंत रुंदीकरणासाठी किती भूसंपादन करावे लागेल, याची चाचपणी केल्याने स्थानिकांच्या पोटात गोळा आला आहे.
नाशिक महापालिकेने सिंहस्थ विकास आराखडा तयार केला असून त्यात ११ हजार कोटी रुपये विकासकामांसाठी व पाच हजार कोटी रुपये भूसंपादनासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. महापालिकेने मागील महिन्यात सिंहस्थ कक्षामध्ये या विकास आराखड्याचे सादरीकरण केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महापालिकेला आराखड्यातील कामांची व्यवहार्यता, निकड तपासण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार आयुक्तांनी या पार्श्वभूमीवर दोन्ही अतिरिक्त आयुक्त व सर्वच खाते प्रमुखांसमवेत पंचवटी परिसरात जाऊन सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सूचवलेल्या प्रत्येक कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. जसेच त्यात सुधारणा करण्याबाबत जागेवरच सूचना दिल्या.
यावेळी त्यांनी श्री काळाराम मंदिर ते सरदार चौक या जुन्या शाही मार्गाची पाहणी करीत त्याचे १२ मीटरपर्यंत रुंदीकरणा करता येईल का याची चाचपणी केली. या शाही मार्गावर काही ठिकाणी सहा तर काही ठिकाणी नऊ मीटर रुंद आहे.
या शाहीमार्गावर २००३ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही मिरवणुकीत चेंगराचेंगरी होऊन ३२ भाविकांचा बळी गेल्यानंतर सरकारने चौकशीसाठी नेमलेल्या रमणी आयोगाने दिलेल्या अहवालात जुन्या शाही मार्गाची रुंदी ३० मीटरपर्यंत वाढवण्याची शिफारस केली होती. मात्र, या मार्गालगत जवळपास पाचशे ते सहाशे वाडे, घरे, दुकाने असून रुंदीकरणासाठी ते तोडावी लागतील. त्यात काही प्राचीन मंदिरांचा समावेश असल्यामुळे स्थानिक नागरिक व राजकीय मंडळींचा विरोध असल्याने तो विषय मागील सिंहस्थात मागे पडला होता.
दरम्यान विद्यमान आयुक्तांनी शाहीमार्ग रुंदीकरणाची चाचपणी केल्यामुळे हा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. दरम्यान या ठिकाणी रुंदीकरणासाठी भूसंपादन व रहिवाशांचे पुनर्वसन हा किचकट मुद्दा असल्यामुळे त्याला विरोध होण्याचीच शक्यता अधिक आहे.
आराखड्यात ही नवीन कामे होणार समाविष्ट
आयुक्तांनी पंचवटीत स्थळ पाहणी करताना संबंधित अधिकारी यांना आराखड्यात नवीन कामांचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या. त्यामध्ये प्रामुख्याने गांधी ज्योत नुतनीकरण करणे, गांधी तलाव सुशोभिकरण करणे, रामकुंड, लक्ष्मणकुंड सांडव्यांची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी तपासणे, नदीकाठावरील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती,
गाडगे महाराज पुलाचे मजबुतीकरण व नुतनीकरण करणे, पंचवटी अमरधाम समोरील पार्किंगसाठी आरक्षित असलेली जागा ताब्यात घेणे, काळाराम मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणे, टाळकुटेश्वर व लक्ष्मीनारायण मंदिर पूलालगत नवीन पूल बांधणे, नवीन भाजीमार्केट येथे सिंहस्थ सुविधा केंद्र उभारणे, तपोवनातील सिंहस्थ इमारतीचे नुतनीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे.