Nashik News नाशिक : महापालिकेची रविवार कारंजा येथील यशवंत मंडईची इमारत सत्तर वर्षांची झाल्याने जीर्ण व धोकेदायक झाली आहे. मागील दोन- तीन वर्षांत अनेकांनी येथील त्यांचे कार्यालये सोडले. त्यातील जवळपास १७ गाळेधारक ताबा सोडण्यास नकार देत आहेत.
महापालिकेने यशवंत मंडईचे त्रयस्थ सस्थेकडून केलेल्या ऑडिटमध्येही ही इमारत धोकादायक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे भाडेकरूंनी सात दिवसांत गाळे खाली करावेत, अन्यथा पोलिसांच्या मदतीने गाळे खाली करून यशवंत मंडईचा ताबा घेतला जाईल, असा इशारा महापालिकेच्या कर संकलन विभागाने या भाडेकरूंना दिला आहे.
यासाठी भाडेकरूंना सात दिवसांची मुदत देणारी नोटीस पाठवली आहे. दरम्यान यशवंत मंडईमधील भाडेकरूंची वीज व नळजोडणी ३१ मेनंतर तोडण्याचाही निर्णय महापालिकेने घेतला आहे.
नाशिकमधील मध्यवर्ती भागात वाहनतळाची सोय नसल्याने वाहनधारक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. त्यामुळे या भागात कायमच वाहतूक कोंडी होत असते. यावर उपाय म्हणून महापालिकेने रविवार कारंजा येथील यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली वाहनतळ उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. मात्र, ७० वर्षांच्या या जीर्ण इमारतीमधील भाडेकरू जागा सोडण्यास तयार नाहीत. यामुळे वाहनतळ उभारण्यास अडचणी येत आहेत.
यासाठी महापालिकेने यशवंत मंडई इमारतीचे स्ट्रक्चर ऑडीट करून घेतले होते. त्यात ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आला. यामुळे पालिकेने ही इमारत जमीनदोस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, भाडेकरूंनी महापालिकेविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने गाळेधारकांच्या विरोधात निकाल दिला असल्याने महापालिका प्रशासनाने या इमारतीचे निर्लेखन करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला असून, जिल्हा न्यायालयाने अद्याप निकाल राखून ठेवला आहे. त्याचा आधार घेत व्यावसायिकांनी गाळे खाली करणार नाही, अशी भूमिका घेतली असली, तरी उच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधाराने महापालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
पावसाळा तोंडावर असून, कुठलीही दुर्घटना होऊ नये म्हणून महापालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या ३१ मेपर्यंत व्यावसायिकांनी गाळे खाली केले नाही तर वीज व नळजोडणी तोडण्याचा इशारा दिला आहे. महापालिकेला सहकार्य न केल्यास पोलिसांची मदत घेऊन गाळे खाली केले जातील, असेही नोटीशीत म्हटले आहे.