नाशिक (Nashik) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा नमामि गोदा प्रकल्प प्रशासकीय दिरंगाईत अडकला आहे. सध्या नमामि गोदाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असले, तरी अद्यापही ड्रोन सर्व्हे पूर्ण झाला नाही. त्यामुळे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होण्यास उशीर झाला असून केंद्र शासनाकडे हा अहवाल सादर करण्यास आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७-२८ या वर्षात सिहस्थ कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने नमामि गोदा प्रकल्प राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी जवळपास १८०० कोटी रुपये देण्यास तत्वता मान्यताही दिली आहे. या प्रकल्पात प्रामुख्याने नदी स्वच्छता हा प्रमुख विषय असून त्यासोबत नदीचे सौंदर्यीकरणही केले जाणार आहे. त्याचबरोबर अहमदाबादच्या साबरमती रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, जैवविविधता जपणे, विविध घाटांचे नूतनीकरण करणे, तसेच दहन भूमी अत्याधुनिक व प्रदूषणमुक्त करणे, नदीचा वाहता प्रवाह स्वच्छ ठेवणे, नदीकिनारी व घाटांवर असलेला घनकचरा संकलित करणे व त्याची योग्य विल्हेवाट लावणे, नदी प्रवाहातील जलचरांची निगा राखणे व जतन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे, जलचरांच्या विविध प्रजाती पूर्ववत करणे व त्यांचे संवर्धन करणे या बाबींचा समावेश आहे.
नमामि गोदाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करीत असलेली सल्लागार संस्था शहरातील पाणीपुरवठा व वितरण व्यवस्था, तसेच पावसाळी व्यवस्था व इतर नागरिकांना पुरविण्यात येणारे सुविधांचे जीआयएस मॅपिंग करून नकाशा तयार करण्याचे काम करीत आहे. यासाठी नगर नियोजन विभागाकडून ड्रोन सर्व्हे केला जाणार आहे. ड्रोन सर्व्हे होत नसल्याने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून शासनाकडे पाठवण्यासाठी आणखी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मात्र, त्यानंतर हाती फक्त तीन वर्षे कामासाठी राहणार असल्याने त्या कालावधीमध्ये नानामि गोदा प्रकल्प अस्तित्वात येईल की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
गोदा स्वच्छतेसाठी आराखडा
नमामि गोदा प्रकल्पामध्ये शहरातील नदी-नाल्यांमध्ये जाणारे सांडपाणी अडवून ते संकलित करून थेट मलनिस्सारण केंद्राकडे वळवणे, यामुळे सांडपाणी मिसळून होणारे गोदावरीचे प्रदूषण टळणे, सद्यःस्थितीत कामटवाडे व मखमलाबाद या दोन ठिकाणी मलनिस्सारण केंद्र उभारणे, महापालिका क्षेत्रातील मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती, क्षमतावाढ करणे, मखमलाबाद व कामटवाडे येथे मलनिसारण केंद्र बांधणे, नव्या रहिवासी भागांमधील मलजल व सांडपाणी मलनिस्सारणकेंद्राकडे वळवण्यासाठी मलवाहिन्या टाकणे, महापालिका क्षेत्रातील औद्योगिक प्रदूषितपाणी एसटीपीच्या माध्यमातून पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा उभारणे आदी कामांचा समावेश आहे.