नाशिक (Nashik) : महापालिकेतील आरोग्यअग्निशमन विभागातील ५८७ पदांच्या भरती प्रक्रिया दिवाळीपूर्वी करता येईल का या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाले आहेत. यासंदर्भातील परीक्षेच्या स्वरुपाचा प्रस्ताव प्रशासनाने तयार करून तो आयुक्तांकडे पाठवला आहे. आयुक्तांच्या परवानगीनंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेला तो पाठवला जाणार आहे. यामुळे दिवाळीपूर्वीच महापालिकेतील भरती प्रक्रियेला सुरवात होणार असल्याचे बोलले जात आहे.
नाशिक महापालिकेच्या आकृतीबंधानुसार ७०९२ पदे मंजूर असून २४ वर्षांपासून महापालिकेने भरती प्रक्रिया राबवलेली नसल्याने सध्या अडीच हजार पदे रिक्त आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या २०११ च्या जनगणणेनुसार १४ लाख होती. सद्यस्थितीत ती लोकसंख्या २२ लाखापर्यंत गेल्याचे अनुमान आहे. कर्मचारी संख्या कमी होत असताना लोकसंख्या वाढल्यामुळे नागरी सुविधा पुरवण्यामध्ये महापालिका यंत्रणेवर ताण पडत आहे. कोरोनाकाळातही अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेला आवश्यक सुविधा देण्यामध्ये अडचणी आल्या होत्या. यामुळे तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी अग्निशमन, आरोग्य व वैद्यकीय विभागाची ६७१ पदांना भरतीसाठी अत्यावश्यक बाब म्हणून मंजुरी दिली होती. त्यानंतर रमेश पवार आयुक्त असताना पुन्हा प्रक्रिया सुरू झाली व टीसीएस कंपनीला काम देण्यात आले आहे.
यात आरोग्य व अग्निशमन विभागातील पदेही तांत्रिक संवर्गातील असून या पदांसाठी इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार आहे. भरतीसाठी परीक्षा टीसीएस कंपनी घेणार असली, तरी परीक्षेचे स्वरूप महापालिका ठरवून देणार आहे. त्यामुळे टीसीएस कंपनीच्या पत्रानुसार वैद्यकीय, अग्निशमन आणि घनकचरा विभागाकडून परिक्षेचे स्वरुप मागवण्यात आले होते. त्यानुसार या तीनही विभागांनी परीक्षेचे स्वरुप प्रशासनाकडे सादर केले आहे. अग्निशमन विभागातील ३४८, आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ पदांच्या भरतीसाठी आता जाहिरात प्रसिद्ध करणे, उमेदवारी अर्ज स्वीकारणे याबाबींची पूर्तता ऑक्टोबरमध्ये सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.