नाशिक (Nashik) : महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेल्या वार्षिक देखभालीच्या ठेक्यातून यंदा ३७ हजार मिटर पावसाळी नाल्यांची सफाई केल्याची महिती जिल्हाधिकारी कार्यालयास कळवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात शहरातील ७५ टक्के नाल्यांची सफाई केली असून १३९४६ चेंबरपैकी १० हजार ४१ चेंबर साफ केले आहे. सध्या हे नालेसफाईचे व चेंबर स्वच्छतेचे काम सुरू असल्यामुळे शहरातील अनेक चौकांमध्ये खोदकाम सुरू असून त्याचा रहदारीला अडथळा होत आहे. उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, असा महापालिकेचा दावा आहे.
महापालिकेडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, चेंबरसफाई यांची कामे केली जातात. त्यासाठी महापालिकेने वार्षिक देखभाल दुरुस्तीच्या ३० कोटींच्या निधीतून खर्च करीत असते. यापूर्वी शहरात नैर्सगिक नाले, पावसाळी गटार, भुयारी गटार, चेंबर, ढापे उघडून स्वच्छ करण्यासासाठी प्रभागनिहाय ठेकेदार निश्चित केले जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांत संपूर्ण शहराच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीचे एकच टेंडर प्रसिद्ध केले जाते.त्यानुसार सहाही विभागांमध्ये ठेकेदार निश्चित केले जातात. त्यात जेसीबी, पोकलेन या मशिनरीसह मुरूम, कच, डांबर तसेच मजुर पुरवण्याचेही काम आहे. यामुळे नालेसफाई व चेंबर स्वच्छतेसाठी वेगळे टेंडर प्रसिद्ध केले जात नाही.
लोकसभा निवडणुकीचे मतदान जिल्हाधिकारी कार्यालयाने आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा घेतला. त्यात त्यांनी संबंधित विभागांकडून पावसाळा पूर्व कामांचा व पूर्वतयारीचा आढावा घेतला. मागील काही वर्षांपासून पहिल्या मोठ्या पावसानंतर नाशिक शहरात मेनरोड, गावठाण या परिसरातील गटारी व चेंबरमधून मोठ्याप्रमाणावर पाणी बाहेर पडून मेनरोड, सराफबाजार या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. तसेच गटारींमधील पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरते. यामुळे महापालिकेकडून नालेसफाई केली जात नसल्याची टीका होत असते. महापालिकेकडून मात्र, दरवर्षी नालेसफाई केल्याचे सांगितले जाते. यामुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून या पावसाळापूर्व नालेसफाई व चेंबर स्वच्छता, दुरुस्ती या कामांची आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्या बांधकाम विभागाने या नालेसफाईचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी सादर केला आहे. त्यानुसार महापाकिलेच्या बांधकाम विभागाने ७५ टक्के कामे झाल्याचा दावा केला आहे. नाशिक हमापालिका हद्दित ३ लाख ६३ हजार २२ मीटर लांबीचे पावसाळी गटार पाईपलाईन आहे. त्यावर १३९४६ चेंबर आहेत. त्यापैकी १० हजार ४१ चेंबर स्वच्छ केल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. शहरात १ लाख २१ हजार मीटर लांबीचे नाले असून त्यातील ५० हजार ९२६ मीटर लांबीची साफसफाई करणे अपेक्षित असताना आतापर्यंत ३७ हजार १३९ मीटर लांबीचे नाले साफ केले असून १३ हजार ७७७ मीटर लांबीचे नाले मेअखेरपर्यंत स्वच्छ केले जाणार असल्याचे महापालिकेने जिल्हाधिकारी यांना कळवले आहे.