नाशिक (Nashik) : शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी इंधनावर चालणाऱ्या वाहनांची संख्या कमी करून इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढवण्यावर भर देण्याचे धोरण सरकारने ठरवले आहे. यासाठी इलेक्ट्रिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्यासाठी सरकार वाहन उद्योगांना प्रोत्साहित करीत आहे. मात्र, या वाहनांच्या बॅटरी रिचार्ज करण्यासाठी पायाभूत सुविधा नसल्याने अद्याप ग्राहक सावधपणे निर्णय घेत आहेत. यामुळे नाशिक महापालिकेने नाशिक शहरात इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग स्टेशनची १५ ठिकाणे निश्चित केले असून, यूएनडीपी या कंपनीने चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सामाजिक दायित्वमधून निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. खासदार हेमंत गोडसे यासाठी महापालिका आणि यूएनडीपी यांच्याशी संपर्क साधत आहेत.
नाशिक शहरात इलेक्ट्रिक वाहनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, वाहन धारकांना या वाहनांच्या बॅटरीज चार्जिंग करण्यासाठी स्वत: सुविधा उभारव्या लागत आहेत. नाशिक शहरात अद्याप एकही सार्वजनिक चार्जिंग स्टेशन नसल्याने पुढील अडचणींचा वाहन धारक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास धजावत नाहीत. यामुळे खासदार हेमंत गोडसे यांनी यूएनडीपी या कंपनीशी संपर्क साधून नाशिक शहरात चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी त्यांचा उद्योग सामाजिक दायीत्व निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ठेवला. दिल्ली येथील यूएनडीपी कंपनी प्रशासनाने यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच याविषयीचे पत्र यूएनडीपी कंपनीने मागील आठवड्यात नाशिक महापालिका प्रशासनाला पाठवले होते. युएनडीपीने पाठवलेल्या पत्राची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने शहरात पंधरा ठिकाणी चार्जिंग स्टेशनच्या लोकेशनचा प्रस्ताव यूएनडीपी कंपनी प्रशासनाला पाठवला आहे.
या ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन
महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन, महापालिका पूर्व भाग उपविभागीय कार्यालय, महापालिका पश्चिम भाग उपविभागीय कार्यालय, पंचवटी, सातपूर, नाशिकरोड, सिडको उपविभागीय कार्यालय, बिटको हॉस्पिटल, झाकीर हुसेन हॉस्पिटल, महाकवी कालिदास कला मंदिरासमोर, इच्छामणी मंगल कार्यालय, बोधले नगर, लेखानगर, गंगापूर रोडवरील प्रमोद महाजन उद्यान, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक.