नाशिक (Nashik) : महापालिकेकडून सिडकोतल्या त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथील अडीचशे कोटी रुपयांचे दोन्ही उड्डाणपूल रद्द करण्याची कारवाई सुरू असताना या दोन्ही कामांचे ठेकेदार असलेल्या पीबीए इन्फास्ट्रक्चर या कंपनीने अत्यंत दर्जेदार पद्धतीने संबंधित काम करण्याची तयारी दाखवली आहे. मुळात कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही काम सुरूच करत नसल्याचे कारण देत त्यापूर्वी पालिकेने दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे. दरम्यान या पुलाचे काम रद्द करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला शेवटची नोटीस पाठवल्यानंतर आता ठेकेदाराने दर्जेदार काम करण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे ठेकेदाराच्या पत्रानंतर महापालिका पुन्हा पुलाचे बांधकाम सुरू करण्याच्या मानसिकतेत तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती खराब असतानाही तसेच अंदाजपत्रकामध्ये किरकोळ तरतूद दाखवून महापालिकेच्या बांधकाम विभागाने मायको सर्कल व त्रिमूर्ती चौक येथे अडीचशे कोटींचे उड्डाणपूल प्रस्तावति केले. या पुलांसाठी प्रशासनाने सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे आरोप होते. महापालिकेच्या बांधकाम विभागाने हे उड्डाणपूल प्रस्तावित करण्यापूर्वी वाहतूक सर्वेक्षणही केले नव्हते, यामुळे बांधकाम विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. दरम्यान या उड्डाणपुलांची टेंडर प्रक्रिया राबवताना विशिष्ट ठेकेदाराला समोर ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. सिमेंटच्या दर्जाची प्रतवारी वाढवण्याच्या नावाखाली ४४ कोटींची परस्पर दर वाढवणे असे प्रकार उघड आले होते. या दोन्ही उड्डाणपुलांच्या कामांना लोकप्रतिनिधींकडूनही प्रचंड विरोध झाल्यानंतरही तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी त्रिमूर्ती चौक उड्डाणपुलाचा कार्यारंभ आदेश दिला. मात्र, मायको सर्कल येथील आदेश देण्यापूर्वीच त्यांची बदली झाली व त्यानंतर आलेले आयुक्त रमेश पवार यांनी तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनंतर मायको सर्कल येथील उड्डाणपुल रद्द केला होता. त्यानंतर सिडकोतल्या उड्डाणपुलाची गरज आहे का याच्या चाचपणीसाठी आयआयटी पवईला वाहतूक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. आयआयटी पवईने जुलैमध्ये या उड्डाणपुलाची गरज नसल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे पवार यांनीच त्रिमूर्ती चौक मधील उड्डाणपुल रद्द करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले होते. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर उड्डाणपूल रद्द करण्याची कारवाई धिम्या गतीने सुरू आहे.
मायको सर्कल येथील उड्डाणपूल रह करण्याचे आदेश दिल्यानंतरही ठेकेदाराने दोन्ही पुलांच्या कामासंदर्भात आग्रह धरला आहे. बांधकाम विभागाने उड्डाणपूल रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कायदेशीर बाब म्हणून ठेकेदाराला नोटीस पाठवल्यानंतर संबंधित ठेकेदाराने ३ जानेवारी रोजी बांधकाम विभागाला पाठवलेल्या पत्रात नवीन तंत्रज्ञानानुसार दोन्ही पूल कसे दर्जेदार होतील तसेच या संदर्भात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार आपण सुधारणा करत आहोत असे उत्तर पाठवले आहे. या पत्रामुळे महापालिकेचा बांधकाम विभाग पूल रद्द करण्याची कार्यवाही करते आहे की, पुलाचे काम सुरू करण्यासाठी वातावरण निर्मिती करीत आहे, असा प्रश्न विचारला जाात आहे.