नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेवरील वाढता दायीत्वाचा बोजा व नागरी कामांसाठी निधी देण्यासाठी असलेले प्राधान्य यामुळे महापालिकेच्या प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधीची चणचण आहे. मात्र,ही कामे थांबवता येत नसल्याने महापालिकेने या प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती आता सीएसआर निधीतून करता येईल का, याची चाचपणी सुरू केली आहे. या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक, यशवंतराव चव्हाण तारांगण व सायन्स सेंटर आदी ३१ कामांचा समावेश आहे. यासाठी महापालिका मोठ्या उद्योगांकडे सीएसआर निधीचे प्रस्ताव देणार आहे.
महापालिकेच्या प्रमुख कामांमध्ये नागरिकांना रस्ते, वीज व पाणी या सुविधा पुरवण्याचा समावेश आहे. यासाठी महापालिका नागरिकांकडून घरपट्टी वसूल करते. तसेच जीएसटीचा वाटा शासनाकडून मिळत असतो. या निधीतून महापालिका चांगले रस्ते, शिक्षण, आरोग्य, पथदीप यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवत असते. त्याचप्रमाणे नागरिकांच्या मनोरंजनासाठी, शिक्षणासाठीही काही प्रकल्पांची उभारणी केली जाते. मात्र, या प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद करणे अनिवार्य नसल्यामुळे बऱ्याचदा या प्रकल्पांच्या देखभालीसाठी महापालिकेकडे निधी शिल्लक राहत नाही. यामुळे महापालिका व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक संस्था, उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ही कामे करीत असते. महापालिकेन यापूर्वी या सामाजिक दायीत्व निधीतून २३५ वाहतूक बेटे, दुभाजक, उद्यानांचा विकास केलेला आहे. यामुळे महापालिकेने त्यांच्या मोठ्या प्रकल्पांसाठीही सीएसआर निधीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील ३१ प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सीएसआर निधी मिळवण्यासाठी नवीन प्रस्ताव तयार केला आहे. या निधीतन चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक, यशवंतराव चव्हाण तारांगण प्रकल्पाच्या पुनर्विकास करण्यात येणार आहे.
सीएसआरमधून प्रस्तावित कामे
चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाचा पुनर्विकास.
यशवंतराव चव्हाण तारांगण पुनर्विकास व संचलन.
गोदाघाट नूतनीकरण व सुशोभिकरण प्रयोजकाच्या माध्यमातून कामे
प्रमोद महाजन उद्यान पुनर्विकास
निमाणी व नाशिकरोड बसस्थानक नुतनीकरण
शाळा, अंगणवाडी इमारतींचे सुशोभिकरण
पुल, चौक, कारंजे दुभाजक, फुटपाथ सुशोभिकरण करणे.
आरक्षित जागेवर क्रीडांगण, होळकर पुलावरील वॉलकर्टन दुरूस्ती
नाशिकरोड येथील सावरकर उड्डाणपुलाचे सुशोभिकरण
सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणी, सौर पॅनल बसविणे.