नाशिक (Nashik) : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमार्फत फोडलेल्या नाशिक शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी त्यांच्याकडूनच प्राप्त झालेल्या जवळपास १४० कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते दुरुस्तीचे कंत्राट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यात रस्ते दुरुस्तीसाठी १०४.७४ कोटी तर खडी, मुरुम पुरवठ्यासाठी विभागनिहाय ३५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. टेंडर प्रक्रिया राबवण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेतल्यास दुरुस्तीचे काम जूनमध्ये सुरू होईल व जुलैमधील सलग पावसामुळे रस्ते पुन्हा नादुरुस्त होतील, यामुळे रस्ते दुरुस्तीचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
नाशिक महापालिकेने उभारलेल्या नवीन रस्त्यांची गेल्या पावसाळ्यात दुरवस्था झाली. त्या रस्त्यांचा दोष निवारण कालावधी शिल्लक असताना ठेकेदार या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी टाळाटाळ करीत होते. यामुळे महापालिकेला त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देऊन अखेर पावसाळ्यानंतर रस्ते दुरुस्ती करवून घेतली होती. सध्या शहरात महानगर नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीकडून घरोघरी पाईपलाईनद्वारे गॅस पुरवण्यासाठी वहिनी टाकल्या जात आहेत. त्यासाठी रस्ते खोदकाम केले जात आहे. या खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी एमएनजीएल कंपनीने महापालिकेला १४०कोटी रुपये दिले आहेत. महापालिकेने रस्ते खोदण्यासाठी दिलेली ३० एप्रिलची मुदत संपल्यानंतर आता या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने हालचाल सुरू केली आहे. मागील पावसाळ्यात शहरातील नित्कृष्ट रस्त्यांचा भांडाफोड झाला होता. या निकृष्ट दर्जाच्या रस्ते बांधणीचे ठेकेदारच आता या नवीन दुरुस्तीच्या कामासाठी छुपे रिंग करीत असल्याचीही चर्चा असल्यामुळे महापालिकेचा बांधकाम विभाग वादात सापडला आहे.
महापालिकेकडून दुरुस्ती केल्या जाणाऱ्या रस्त्यांसाठी एमएनजीएल कंपनीने निधी दिला असून त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकातील रक्कम वापरायची नसल्याने, मोठया ठेकेदारांनी शहरातील सहाही विभागाच्या देखभाल दुरुस्तीचे कंत्राट मिळवण्याची तयारी केली असल्याचे सांगितले जाते. या रस्त्यांची दुरुस्ती जूनमध्ये झाल्यानंतर जुलैमध्ये पावसामुळे रस्ते खराब झाले असे सांगत पावसावर खापर फोडणे सोपे असते, यामुळे जूनमध्ये रस्तेदुरुस्ती म्हणजे केवळ मलमपट्टी ठरण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे ही रस्ते दुरुस्ती पावसाच्या पाण्यात वाहून जाण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा आहे.
पाच वर्षांत १२०० कोटींचे रस्ते
नाशिक महापालिकेने गेल्या पाच वर्षांत जवळपास बाराशे कोटी रुपये रस्त्यांवर खर्च केले आहेत. सर्वसाधारणपणे एखादा रस्ता केला तर तीन ते पाच वर्षे तो सुस्थितीत असणे अपेक्षित असते. किंबहुना हा काळ त्याच्या देखभाल-दुरुस्तीचा असून या काळात रस्ता खराब झाल्यास तो दुरुस्त करून देण्याची जबाबदारी ठेकेदाराची असते. शहरातील रस्त्यांवर अवजड वाहनांची वर्दळ कमी असल्यामुळे पूर्वी जे रस्ते झाले ते दहा वर्षे सुस्थितीत राहिले. गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते तयार झाल्यानंतर काही महिन्यांतच उखडण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे यापूर्वी नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना या दुरुस्तीपासून दूर ठेवण्याची मागणी होत आहे.