नाशिक (Nashik) : लोकसभा निवडणुकीनंतर प्रशासन पुन्हा रुळावर आले असून जिल्हाधिकारी कार्यालयाने २०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळा विकास कामांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे. त्यात पहिल्या टप्प्यात महापालिकेने तयार केलेल्या ११ हजार कोटींच्या सिंहस्थ प्रारुप आराखड्यातील सहा कोटींच्या कामांचे सादरीकरण महापालिकेच्या बांधकाम विभागाने केले आहे. इतर विभागांच्या प्रारुप आराखड्याचे सादरीकरण पुढील आठवड्यात होणार आहे. सिंहस्थ कुंभेमळा अवघ्या तीन वर्षांवर आला असून प्रशासनाकडून तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यावर भर दिला जाणार आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या सिंहस्थानिमित्त नाशिक शहर व परिसरात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ११ हजार कोटींचा प्रारुप आराखडा तयार केला असून तो जिल्हाधिकारी कार्यालयातील सिंहस्थ कक्षाकडे यापूर्वीच दिला आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीचे मतदार आटोपल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा कक्षातर्फे पहिली आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता उदयकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल, नगर रचना विभागाचे उपसंचालक हर्षद बाविस्कर आदी उपस्थित होते.
यावेळी महापालिकेच्या बांधकाम विभागाचे शहर अभियंता उदयकुमार वंजारी यांनी ६ हजार कोटीच्या आराखड्याचे सादरीकरण केले. यात प्रामुख्याने भूसंपादन, शहरातील अंतर्गत बाह्य व मध्यम रिंग रोड, गोदावरी व तिच्या उपनद्यांवरील विविध ठिकाणचे २१ पूल, साधू ग्राम तसेच मागील सिंहंस्थात प्रलंबित राहिलेल्या रिंग रोडना जोडणारे उपरस्त्यांसाठी भूसंपादन आदी कामांचा समावेश आहे. सिंहस्थ कुंभमेळा तीन वर्षांवर येऊन ठेपल्याने ही कामे तातडीने करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिकेने केलेल्या सादरीकरणातील प्रत्येक प्रत्येक विकास कामांचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. यावेळी उर्वरित पाच हजार कोटींच्या कामांचेही सादरीकरण करण्यात आले.