नाशिक (Nashik) : महापालिकेतील अकरा विभागांच्या सेवाप्रवेश नियमावलीच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली. यामुळे या बहुप्रतीक्षित भरती प्रक्रियेस हिरवा कंदिल मिळाला आहे. नाशिक महापालिकेने यापूर्वीच अग्निशमन व आरोग्य विभागातील ७०४ पदांच्या भरतीबाबात तांत्रिक पूर्तता करण्याचे काम सुरू केले असताना आता इतर विभागांतील अडीच हजार रिक्त पदांनाही मान्यता दिल्याने राज्य सरकारच्या मान्यतेनंतर महापालिकेत दुसरी जम्बो भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकारने ७५ हजार पदांची भरती करण्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्याचाच भाग म्हणून नगरविकास विभागाने महापालिकेला रिक्त पदांच्या भरतीसाठी सेवाप्रवेश नियमावली तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या अकरा विभागांनी सेवा प्रवेश नियमावली प्रस्ताव तयार करून ते महासभेत मांडले होते. महासभेच्या मान्यतेनंतर संबंधित सेवाप्रवेश नियमावली अंतिम मंजुरीसाठी नगरविकास विभागाकडे पाठविली जाणार असून, गेल्या २१ वर्षांपासून वाढीव आस्थापना खर्च, आकृतिबंध आणि अन्य अडचणींमुळे रखडलेल्या महापालिकेतील प्रस्तावित नोकरभरती प्रक्रियेला आता वेग येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महापालिका, नगरपरिषदांमध्ये ४० हजार पदांच्या भरतीची घोषणा केल्यानंतर नाशिक महापालिकेतील नोकरभरती दृष्टिपथात आली आहे. महापालिकेचा 'ब' वर्गात समावेश होऊन दहा वर्षांचा कालावधी उलटला, तरी आस्थापना परिशिष्ट मात्र 'क' वर्गाचाच कार्यरत आहे. महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर विविध संवर्गातील ७,०९० पदे मंजूर आहेत. सुमारे २,८०० हूनअधिक पदे दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त झाली आहेत. गेल्या २१ वर्षांपासून महापालिकेत नोकरभरतीच झालेली नाही. 'ब' संवर्गानुसार सरकारच्या मान्यतेसाठी सादर केलेल्या १४ हजार पदांच्या सुधारित आकृतिबंधाला सरकारने गेल्या आठ वर्षांत मंजुरी दिलेली नाही. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असताना उपलब्ध साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांना मूलभूत सेवा-सुविधा पुरविताना महापालिकेची दमछाक होत आहे. अशा परिस्थितीत वारंवार पाठपुरावा केल्यानंतर गतवर्षी ७०४ पदांच्या भरतीला मान्यता दिली होती.
या विभागांची सेवा प्रवेश नियमावली
नाशिक महापालिकेच्या महासभेने प्रशासकीय सेवा, लेखा व लेखापरीक्षण, वैद्यकीय व आरोग्य अभियांत्रिकी (विद्युत), अभियांत्रिकी (स्थापत्य), जलतरण तलाव, उद्यान व वृक्ष प्राधिकरण, नाट्यगृह व सभागृह, तारांगण व फाळके स्मारक, सुरक्षा, माहिती-तंत्रज्ञान अशा अकरा विभागांच्या सेवाप्रवेश नियमावलीचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. आता नगरविकास विभागाने ही नियमावली मंजूर केल्यावर महापालिकेत या विभागांमधील नोकरभरतीचा श्रीगणेशा होणार आहे.