नाशिक (Nashik) : नाशिक शहरातील सातपूर व सिडको परिसरात आठवडभरापासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. गंगापूर धरणातून आलेली थेट जलवाहिनी ही सिमेंटची असून तिची दुरुस्ती करण्यात अडथळे येत आहेत. यावर तोडगा म्हणून नाशिक महापालिकेने अमृत योजनेतून 200 कोटींची 13 किमी लांबीची लोखंडी पाईप टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सप्टेंबरमध्ये टेंडर प्रसिद्ध केले जाणार आहे.
सिडको, सातपूर व पश्चिम विभागाचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. शनिवार व रविवार या दोन दिवशी विस्कळित पाणीपुरवठ्याने टोक गाठले. परिणामी धरणात पुरेसा पाणीसाठा व पाऊस सुरू असतानाही नागरिकांना पाण्यासाठी रस्त्यावर यावे लागले. गार्डन चौकात सिमेंट जलवाहिनी फुटल्याने हा प्रकार घडला. जवळपास 25 फूट खोल जाऊन काम करावे लागल्याने चार ते पाच दिवस नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम झाले. त्यासाठी जवळपास 16 जणांची टीम कार्यरत होती. या कामामुळे सोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीत झाला. मात्र, यानिमित्ताने पुन्हा एकदा थेट जलवाहिनी बदलण्याचा मुद्दा समोर आला आहे.
गंगापूर धरणातून सातपूरच्या बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत महापालिकेची 120 सेमी व्यासाची सिमेंट जलवाहिनी टाकलेली आहे. ही जलवाहिनी वारंवार फुटत असून तिच्या दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य बाजारात उपलब्ध नसल्याने दुरुस्तीसाठी मोठा अडथळा येत असतो. यामुळे या कालबाह्य सिमेंट जलवाहिनी ऐवजी आता लोखंडी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पंधराव्या वित्त आयोगातून त्यासाठी 200 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. अमृत- 2 योजनेतून हा निधी उपलब्ध होणार आहे.
सप्टेंबरमध्ये टेंडर
जलवाहिनीबरोबरच धरणातून उपसलेले पाणी प्रेशर टँकमध्ये आणण्यासाठी धरणाच्या पायथ्याशी ब्रेक प्रेशर टँक उभारला जाणार आहे. हा निधीदेखील 15 व्या वित्त आयोगातून खर्च केला जाणार असून, सविस्तर प्रकल्प आराखड्याला यापूर्वी महासभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कामाची निविदा काढता येणे शक्य आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली.