नाशिक (Nashik) : महापालिकेच्या परिवहन महामंडळाची सिटीलिंक बससेवा ठेकेदार व कर्मचारी यांच्यातील वादामुळे अलिकडच्या काळात वारंवार बंद पडत आहे. या महिन्यात तर सलग चार दिवस बससेवा बंद राहिल्याने महापालिकेची नाचक्की झाली होती. यामुळे ठेकेदार व वाहक-चालक यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने आता ही सेवा चालवण्यासाठी तीन ठेकेदार नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या दुसरा ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच या तिसऱ्या ठेकेदाराच्या नियुक्तीसाठी टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सुरवातीला महापालिकेने एकच ठेकेदार नेमला होता. मात्र, संपामुळे संपूर्ण शहरातील बससेवा ठप्प होते. यामुळे दुसरा ठेकेदार नेमला. आता तिसरा ठेकेदार नेमल्याने वाहकांनी संप केला, तरी संपूर्ण शहरातील बससेवा ठप्प होणार नाही व प्रवाशांची अडवणूक होणार नाही, असे महापालिकेला वाटते.
महापालिकेकडून जुलै २०२१ मध्ये सिटीलिंक ही शहर बससेवा सुरू करण्यात आली. सिटी लिंक या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बससेवेचा ठेका सध्या मॅक्सी कॅब या कंपनीला देण्यात आला आहे. तपोवनातील डेपोतून १५० बस व नाशिकरोड डेपोतून १०० बस ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून चालविल्या जातात. या बससेवेतून महापालिकेला रोज लाखो रुपयांचा तोटा होत आहे. त्यातच ठेकेदाराने वाहकांचे जुलै महिन्याचे वेतन थकविल्यामुळे जवळपास चार दिवस संप करण्यात आला. यामुळे शहरातील प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार वेठीस धरले गेले. तसेच या बससेवेच्या विश्वासार्हतेवर त्याचा परिणाम झाला. ठेकेदाराकडून वाहक व चालकांना वेळेवर वेतन दिले जात नाही.
महापालिकेकडून रक्कम देण्यास उशीर झाल्यास ठेकेदार थेट महापालिकेकडे बोट दाखवून वाहकांचे वेतन देत नाही. परिणामी संपाचे हत्यार उपसले जाते. यामुळे या ठेकेदाराची मक्तेदारी मोडीत काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यातून महापालिकेने नाशिकरोड विभागाच्या बस चालवण्याचा दुसरा ठेका युनिटी कंपनीला दिला आहे. याबाबत तांत्रिक प्रक्रिया पर्ण केली जात असून त्यानंतर सप्टेंबरमध्ये नाशिकरोड डेपोच्या पूर्ण बसेस युनिटी कंपनीकडून चालवल्या जाणार आहेत. दोन ठेकेदार झाल्यामुळे भविष्यात संप झाला,तरी तो एकाच कंपनीचा होईल व दुसरी कंपनी प्रवाशांना वाहतूक सेवा देत राहील, असा महापालिकेचा कयास आहे. त्याच धर्तीवर आता तपोवन डेपोसाठीही तिसरा ठेकेदार नेमण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी लवकरच टेंडर प्रसिद्ध केले जाणार आहे. यामुळे भविष्यात महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यास संपूर्ण शहर बससेवा ठप्प होणार नाही व नागरिकांची गैरसोय टळणार आहे.