नाशिक (Nashik) : राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्थानिक स्वराज्यसंस्थांसाठी आस्थापना खर्च ३५ टक्क्याच्या आत असण्याची मर्यादा शिथील केली आहे. यामुळे नाशिक महापालिकने नुकतेच सेवा व प्रवेश नियमावली मंजूर केलेल्या अडीच हजार पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिक महापालिकेत या आधीच अग्निशमन व वैद्यकीय सेवेतील ७०४ पदांची भरतीप्रक्रिया सुरू असताना आता त्यात आणखी २८०० पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने लवकरच महापालिकेत जवळपास ३५०० पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. नाशिक महापालिकेचा 'ब' वर्गात समावेश होऊन दहा वर्षांचा कालावधी उलटला तरी आस्थापना परिशिष्ट मात्र 'क' वर्ग आहे. महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर विविध संवर्गातील ७०९० पद मंजूर असून, त्यातील जवळपास २८०० हून अधिक पदे रिक्त आहेत. मात्र, २१ वर्षांपासून महापालिकेत नोकर भरती झालेली नाही.
'ब' संवर्गानुसार शासनाच्या मान्यतेसाठी १४ हजार पदांचा सुधारित आकृतिबंध शासनाला सादर केला असला तरी मागील आठ वर्षात त्याला मंजुरी मिळालेली नाही. आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा जास्त आ त्यामुळे अत्यावश्यक पदे भरण्यासाठी मंजुरी मिळू शकली नाही. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अग्निशमन सेवा, वैद्यकीय सेवा, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन सेवा, आदी स्वरूपाची पदे भरण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनास सादर केल्याने आस्थापना खर्चाच्या ३५ टक्के मर्यादिची अट तात्पुरती शिथिल केली. यामुळे २८०० पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान शासनाने कोविडच्या पार्श्वभूमीवर तातडीची बाब म्हणून अग्निशमन विभागाच्या ३४८, वैद्यकीय व आरोग्य विभागातील ३५८ अशा ७०४ पदांच्या भरतीला मान्यता दिली. या भरतीसाठी महापालिकेने आयबीपीएस संस्थेसोबत कराराची प्रक्रियाही सुरू केली आहे. त्यानंतर नुकतेच महासभेत अकरा विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी देऊन त्याचा प्रस्ताव शासनाला प्रस्ताव सादर केला आहे.
या विभागांत होणार भरती
प्रशासकीय सेवा, लेखा व लेखापरिक्षण, वैद्यकीय व आरोग्य, अभियांत्रिकी (विद्युत), अभियांत्रिकी (स्थापत्य), जलतरण तलाव, उद्यान व वृक्षप्राधिकरण, नाट्यगृह व सभागृह, तारांगण व फाळके स्मारक, सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान या ११ विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी मिळाली आहे.