नाशिक (Nashik) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांना आराखडा तयार करण्याच्या सूचना देऊन या सर्व विभागांचा मिळून महापालिकेने ११ हजार कोटींचा आराखडा केला आहे. या आराखड्यात महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने १५१ कोटी रुपयांचा आराखडा सादर केलेला आहे. या आराखड्यामध्ये गावठाण भागातील स्वच्छतेसाठी वीस कोटी रुपयांच्या निधीतून छोटी वाहने खरेदीचा समावेश आहे. मुळात महापालिका घनकचरा व्यवस्थापनासाठी ठेकेदारामार्फत घंटागाडी प्रकल्प चालवत असताना स्वता वाहने खरेदी करण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. महापालिकेने सिंहस्थाच्या निमित्ताने त्यांच्या ४२ विभागांना विकासकामांचे आराखडे तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सर्व विभागांचा मिळून ११ हजार कोटींचा आराखडा तयार झाला असून त्यात साडेतीन हजार कोटी रुपये फक्त साधुग्रामच्या भूसंपादनासाठी आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागानेदेखील आराखडा सादर केला. त्यांच्या १५१ कोटी रुपयांच्या आराखड्यात पंचवटी व जुने नाशिक या गावठाणाच्या भागात स्वच्छतेसाठी छोटी वाहने खरेदी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. गावठाण भागामध्ये छोट्या गल्ली व बोळ असल्याने येथे मोठे वाहने स्वच्छतेसाठी जाऊ शकत नाही. त्यामुळे वीस कोटी रुपये खर्च करून छोटी वाहने खरेदी करण्यासाठी खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर सिंहस्थ कालावधीमध्ये गोदाघाट स्वच्छतेसाठी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठीदेखील वीस कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. जंतुनाशक औषधे फवारणीसाठी दोन कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित केला आला आहे.
महापालिकेने सध्या घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटागाड्यांचा ३५६ कोटींचा ठेका पाच वर्षांसाठी दिलेला आहे. यात गल्लीबोळांमध्ये कचरा गोळा करण्यासाठी छोटी वाहने वापरणेही बंधनकारक केले असून त्यानुसार सध्या गावठाण व पंचवटी या गावठाणात छोट्याघंटागाड्यांच्या माध्यमातून कचरासंकलन हो असते. यानंतरही महापालिकेने २० कोटींची छोटी वाहने कचरा गोळा करण्यासाठी का, प्रस्तावित केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने केंद्र व राज्य सरकार निधी देणार आहे, म्हणून होऊ दे खर्च या भावनेतून कामे प्रस्तावित केली असल्याची यानिमित्ताने चर्चा होत आहे.
तीन कोटींचे निर्माल्यकलश
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार आहे. गरजेमुळे मोठ्या प्रमाणात निर्माल्य व अन्य घनकचरा तयार होणार आहे. शहरात अस्वच्छता दिसू नये यासाठी जागोजागी निर्माल्य संकलन व कचरापेटी ठेवल्या जाणार आहेत. त्यासाठी तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. साधूग्राममध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ५०० लिटर क्षमतेच्या ६० लाख रुपयांच्या पाण्याच्या टाक्या खरेदी केल्या जाणार आहेत.