नाशिक (Nashik) : येथे २०२७ मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या अखत्यारित विषयांबाबत २५ ऑगस्टपर्यंत प्रारूप विकास आराखडा सादर करावा, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत. या आराखड्यात प्रामुख्याने भाविक, साधू- महंतांना सेवा पुरविण्याच्या कामांचा समावेश अपेक्षित आहे. सिंहस्थ कुंभमेळा काळात साधू-संत, महंत, भाविकांना सेवा व सुविधा पुरवण्याची जबाबदारी नाशिक महापालिकेची आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होत असतो. त्यात नाशिक शहरातील सिंहस्थाच्या व्यवस्थापनाची प्रमुख जबाबदारी नाशिक महापालिकेकडे असते, तर त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थाचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केले होते. मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक येथे तीनही शाही पर्वण्या मिळून एक कोटी भाविक येतील, असा अंदाज गृहित धरून विकास आराखडा तयार करण्यात आला होता. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भाविकांच्या आकडेवारीबाबत उल्लेख नसला, तरी मागील सिंहस्थापेक्षा अधिक भाविक येतील, असे गृहित धरून प्रारुप आराखडा तयार केला जाणार आहे.
सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक शहराचा शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन अनेक पायाभूत सुविधांची उभारणी केली जाते. यामुळे या प्रारुप आराखड्यात त्याचाही समावेश केला जातो. यावेळी नाशिक शहराच्या बाह्य व अंतर्गत रिंगरोड तयार करण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच साधुग्रामसाठी भूसंपादन करण्याची महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही. यामुळे महापालिकेने रोख रकमेच्या बदल्यात जमीन धारकांना शासनाने अडीच ते तीन पट टीडीआर देऊन भूसंपादन करावे, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. या दोन बाबी वगळल्यास महापालिकेने अद्याप सिंहस्थाची पूर्वतयारीसाठी कोणताही आराखडा तयार केलेला नाही. यापूर्वी विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, आराखड्याबाबत काहीही हालचाली झाल्या नव्हत्या. यामुळे महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांनी प्रारूप आराखडा तयार करून २५ ऑगस्टपर्यंत सादर करावा, अशा सूचना आयुक्त करंजकर यांनी विभाग प्रमुखांच्या बैठकीत दिल्या आहेत. त्यानंतर २८ ऑगस्टला विभागप्रमुखांच्या बैठकीत त्यावर चर्चा होईल. त्यानंतर हा प्रारूप आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे सादर केला जाणार आहे.
पाणीपुरवठा विभागाचा हजार कोटींचा आराखडा
- सिंहस्थाच्या पार्श्वभूमिवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने एक हजार कोटींच प्रारुप आराखडा तयार केला आहे.
- साधुग्राममध्ये २० दशलक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यासाठी : पाच कोटी रुपये
- साधूग्राम व भाविक मार्गावर जलवाहिन्या टाकण्यासाठी : २४० कोटी रुपये.
- साधूग्रामकडे येणाऱ्या रस्ते व वाहनतळावर पाण्याची व्यवस्था करण्यासाठी : २५ कोटी रुपये.
- गंगापूर धरणासाठी नवीन पंपिंग मशिनरी बसविण्यासाठी : १५ कोटी.
- विल्होळी जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता १३७ दशलक्ष लिटरपर्यंत वाढविण्यासाठी : ७५ कोटी.
- मुकणे धरणातून वाढीव क्षमतेची पंपिंग मशिनरी खरेदी करण्यासाठी : २५ कोटी.
- विल्होळी ते पंचवटी नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी : ३१५ कोटी.
- दारणा धरणातून थेट जलवाहिनी टाकण्यासाठी : ३०० कोटी रुपये.