नाशिक (Nashik) : सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी विकास आराखडे सादर करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी सर्व विभागांना आदेश दिल्यानंतर मुदतीमध्ये केवळ तीन विभागांनी प्रारुप आराखडे सादर करण्यात आले होते. यामुळे या विभागांना आता मुदत वाढवून दिली असून बुधवारी (दि.६) सर्व विभागांकडून प्रारुप आराखडे सादर होणार आहेत. आतापर्यंत बांधकाम, आरोग्य व मलनिस्सारण या तीन विभागांचेच प्रारूप आराखडे तयार झाले आहेत. सर्व विभागांचे प्रारुप आराखडे सादर झाल्यानंतर त्या सर्वांचा मिळून महापालिका एकत्रित आराखडा तयार करण्यात येणार आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी पातळीवरून तसेच महापालिकेतर्फे स्वतंत्र विकास आराखडे तयार केले जातात. त्यानुसार नाशिक महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी सर्व विभागप्रमुखांना त्यांच्या त्यांच्या विभागांचे सिंहस्थ पूर्वतयारी प्रारुप आराखडे तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी पालिकेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या विभागप्रमुखांना दिलेली निर्धारित वेळ संपल्यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेतील खातेप्रमुखांची सिंहस्थ आढावा बैठक मागील आठवड्यात घेण्यात आली. बैठकीत बांधकाम, आरोग्य व मलनिस्सारणया तीनच विभागांनी प्रारूप आराखडे सादर करीत सिंहस्थांतर्गत करावयाच्या आवश्यक कामांची माहिती सादर केली. बांधकाम विभागामार्फत सुमारे २५०० कोटींच्या सिंहस्थ कामांचे सादरीकरण करण्यात आले. मलनिस्सारण विभागाने ६२७ कोटींच्या कामांचा प्रारुप आराखडा सादर केला.
इतर विभागांचे प्रारुप आराखडे अपूर्ण असल्याने त्यांना ते सादर करण्यासाठी बुधवार (दि. ६) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ६ सप्टेंबरला होत असलेल्या या सिंहस्थ पूर्वतयारी आढावा बैठकीत सर्व विभागांकडून प्रारुप आराखडे सादर होणार असून त्याच बैठकीत महापालिकेचा एकत्रित प्रारुप आराखडा तयार केला जाणार आहे. तो आराखडा महापालिका आयुक्तांना सादर केला जाईल. या प्रारुप आराखड्यामध्ये प्राधान्यक्रमाने कामांचा समावेश करण्याच्या सूचना यापूर्वीच महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आहेत. महापालिकेचा एकत्रित प्रारुप आराखडा सादर झाल्यानंतर त्या आराखड्यात सूचवलेल्या कामांची स्थळपाहणी केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम झालेला आराखडा नाशिक जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राज्य सरकारला सादर केला जाईल.