नाशिक (Nashik) : आगामी संस्था कुंभमेळ्याला पाच वर्ष बाकी असून त्यासाठी महापालिकेने तयार केलेल्या प्राथमिक आराखड्यात गोदाघाट विकसित करणे, रामकुंडाकडे येणारे रस्ते विकसित करणे, सुशोभीकरण या कामांना प्राधान्य दिले आहे. स्मार्टसिटीअंतर्गत अशी कामे होत असताना पुन्हा तीच कामे तोडून नव्याने करणार का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी महापालिकेला प्राप्त होतो. प्राप्त झालेल्या निधीतून सिंहस्थाशी संबंधित पायाभूत सुविधांची कामे केली जातात. याच प्रामुख्याने साधूग्राम, तपोवन व रामकुंड परिसरातील कामांचा सिंहस्थ कुंभमेळा साधू, संतांसाठी पर्वणीचा काळ असतो. त्याचप्रमाणे शहराच्या विकासाच्या दृष्टीनेही ती विकास पर्वणी असते. राज्यातील सत्तांतरानंतर सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात सातत्याने विचारणा होत असल्याने या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्राथमिक स्वरूपात नियोजन सादर केले खरे, परंतु आराखड्यात 2015 च्या सिंहस्थ कुंभमेळा काळात केलेल्या नियोजनाची 'री' ओढल्याचे दिसून येते. कायमस्वरूपी टिकेल अशा एकही योजनेचा समावेश नसल्याने महापालिकेने फक्त सोपस्कार पार पाडल्याची चर्चा आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राप्त होणाऱ्या निधीतून शहरातील प्रमुख रस्ते, ड्रेनेज, पावसाळी गटार योजना या कामांचादेखील समावेश केला जातो. मात्र, महापालिकेने तयार केलेल्या या नवीन प्राथमिक अहवालात यापैकी कुठल्याच कामाचा समावेश नाही. त्यामुळे संस्थांच्या कामासंदर्भात महापालिका प्रशासन खरोखर गांभीर्याने घेत आहे का, असा सवाल उपस्थित होतो.
सिंहस्थ आराखड्यातील कामे
* रामकुंड परिसर विकसित करणे.
* गोदावरी नदीचे घाट विकसित करणे.
* रामकुंडात स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे.
* शहराच्या बाह्य भागात वाहनतळ विकसित करणे.
* शहरातील अंतर्गत व बाह्य रिंग रोड विकसित करणे.
* आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने उपाययोजना करणे.
* साधूग्राममध्ये सुविधा पुरवणे