नाशिक (Nashik) : केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून मंजूर ६५ कोटी रुपयांतून पालिका हद्दीत १०६ आरोग्यवर्धिनी उपकेंद्र सुरू करण्यास विलंब होत असल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी ३० डिसेंबरपर्यंत ३० आरोग्यवर्धिनी केंद्रांचे काम पूर्ण करून किमान १० आरोग्य केंद्रांचे १५ जानेवारीच्या आत उद्घाटन करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. मात्र, ही कामे मुदतीत पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचे लक्षात येताच महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी बांधकाम विभागाला जबाबदार धरत कार्यकारी अभियंता नितीन पाटोळे, संदेश शिंदे आणि सचिन जाधव यांना नोटीस बजावली आहे. यामुळे ही कामे पूर्ण न झाल्यास त्याचे खापर या अधिकार्यावर फुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागरी भागात वैद्यकीय सेवा भक्कम करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने महापालिका क्षेत्रात आरोग्यवर्धिनी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नाशिक महापालिकेला पंधराव्या वित्त आयोगातून १०६ आरोग्य उपकेंद्रे अर्थात आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्यासाठी ६५ कोयी रुपये निधी मंजूर केला आहे. मात्र, यापैकी आतापर्यंत केवळ एकच आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू झाले आहे. आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मागील मेमध्ये महापालिकेत या आरोग्यवर्धिनी केंद्राचा आढावा घेतल्यानंतरही याबाबत काहीही प्रगती झाली नाही. या सहा महिन्यांत महापालिकेने १०६ आरोग्य वर्धिनी केंद्रांपैकी ९२ केंद्रांना प्रशासकीय मान्यता दिल्या असून ३० उपकेद्रांसाठी टेंडर प्रक्रिया राबवली आहे. महापालिकेकडून या आरोग्यकेंद्रांबाबत टाळाटाळ चालल्याने निधी जाण्याची शक्यता निर्माण झाल्याची बातमी टेंडरनामाने प्रसिद्ध केल्यानंतर डॉ. भारती पवार यांनी महापालिकेकडून या कामाचा आढावा घेतला असून या कामांसाठीचा एक रुपयाही परत जाता कामा नये, अशा सूचना दिल्या आहेत.
महापालिकेने ५९ कामांना कार्यारंभ आदेश दिले असून त्यातील ३० आरोग्य वर्धिनी केंद्र या वर्षाखेरीस काम पूर्ण होणार असल्याचे राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना सांगितले आहे. तसेच १० उपकेंद्राचे १५ जानेवारीस उद्गाटन करण्याबाबतही आश्वस्त केले आहे. प्रत्यक्षात या ३० केंद्रांची कामे वर्षाखेरीस पूर्ण करून त्यातील १० केंद्रांचे १५ जानेवारीस उद्गाटन करणे शक्य होणार असल्याची वस्तुस्थिती महापालिका प्रशासनाच्या लक्षात आली आहे. यामुळे दिलेल्या शब्दाप्रमाणे कामे पूर्ण न त्याचे खापर आपल्यावर फुटू नये व आरोग्य राज्य मंत्र्यांना याबाबत काय कारवाई केली हे दाखवण्यासाठी महापालिका प्रशासनाने बांधकाम विभागाचे सातपूर व पश्चिमचे कार्यकारी अभियंता सचिन जाधव, पंचवटी व नाशिकरोडचे कार्यकारी अभियंता संदेश शिंदे व नाशिक पूर्व व सिडकोचे कार्यकारी अभियंता नितीन पाटोळे यांना दिरंगाईबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ३० डिसेंबरपर्यंत ३० उपकेंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.