नाशिक (Nashik) : नाशिक महापालिका हद्दित केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत १०५ आरोग्य वर्धिनी केंद्रांना मंजुर मिळाली असून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी डिसेंबरमध्ये अल्टिमेटम दिल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही केली. यामुळे या १०५ आरोग्यवर्धिनी केंद्रांपैकी २० आरोग्यवर्धिनींचे काम पूर्ण झाले असून इतर २० ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान काम पूर्ण झालेले आरोग्यवर्धिनी केंद्र प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाला डॉक्टर्स मिळत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे आरोग्य वर्धिनी केंद्रांसाठी कोणी डॉक्टर देता का डॉक्टर, असे म्हणण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ग्रामीण भागाप्रमाणेच नागरी भागातही सार्वजनिक आरोग्य सेवेचे जाळे निर्माण करण्यासाठी तसेच नागरी भागातील नागरिकांना छोट्या-मोठ्या आजारांवर तातडीने उपचार मिळावेत, यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक महापालिका हद्दित १०५ केंद्र उभाण्यात येणार असून त्याासाठी केंद्र सरकार १५ व्या वित्त आयोगामधून महापालिकेला ६५ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे भविष्यात आरोग्यवर्धिनीमधून नाशिककरांना आरोग्य सेवा मिळणार आहे. मात्र, सुरवातीला या आरोग्य वर्धिनी केंद्रांना महापालिकेकडून जागा उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ झाली.
मागील वर्षी मेमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महापालिकेतील संबंधित अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन आरोग्य वर्धिनी केंद्रांच्या जागेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पुढील सहा महिन्यांमध्ये केवळ टेंडर प्रक्रिया राबवण्यातच वेळ घालवला गेला. दरम्यान डिसेंबर २०२३ मध्ये राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महापालिकडून या आरोग्य वर्धिनी केंद्रांचा आढावा घेतला असता त्यांनी ५८ आरोग्य वर्धिनी केंद्रांच्या कामासाठी कार्यारंभ आदेश दिले असून ३१ डिसेंबरपर्यंत ३० कामे पूर्ण होतील व १५ जानेवारीपर्यंत आणखी १० पूर्ण होतील, असे कळवले होते. दरम्यान या मुदतीत महापालिका प्रशासनाला त्यांचा शब्द पाळता आला नसला, तरी आतापर्यंत केवळ २० ठिकाणच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या २० ठिकाणी आरोग्य सेवा प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी हवे असलेले मनुष्यबळ महापालिकेकडे नसल्याचे समोर आले आहे. यामुळे आतापर्यंत बांधकामाअभावी रखडलेले आरोग्यवर्धिनी केंद्र सक्षम मनुष्यबळाअभावी रखडल्याचे दिसत आहे. एका आरोग्य वर्धिनी केंद्रासाठी एक एमबीबीएस डॉक्टर, एक स्टाफ नर्स, एक बहुउद्देशीय कर्मचारी, एक शिपाई व एक सुरक्षारक्षक अशा मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मात्र, महापालिकेकडे डॉक्टरांसह इतर कर्मचारी नसल्याने आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करता येत नाहीत.
महापालिकेने या आरोग्य वर्धिनी केंद्रांसाठी एमबीबीएस डॉक्टरांसाठी जाही दिली होती. त्यात केवळ सहा जण मुलाखतीसाठी आल्याने आरोग्य विभागाच्यापुढे डॉक्टर भरतीचे नवे संकट उभे राहिले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभाात २००८ नंतर भरती झालेली नाही. यामुळे या आरोग्य वर्धिनी केंद्रांसाठी महापालिकेकडे मनुष्यबळ नाही. यामुळे या आरोग्य वर्धिनी केंद्रांचे भवितव्य पुन्हा अंधारात सापडले आहे.
काम पूर्ण झालेले २० आरोग्यवर्धिनी केंद्र
जिजामाता व्यायामशाळा (नाशिकरोड), महापालिका इमारत, घाडगे मळा (नाशिकरोड), महापालिका व्यायाम शाळा, चाडेगाव (नाशिकरोड), महापालिका व्यायामशाळा (चेहडी), नाना नानी पार्क, सौभाग्यनगर (सिडको), गोदावरी सोसायटी (नाशिकरोड), महापालिका शाळा, विहितगाव चुंचाळे घरकुल (अंबड), आझाद नगर (सातपूर), समाजमंदिर, महादेव वाडी (सातपूर), विधाते नगर (सातपूर), महापालिका समाजमंदिर (नाशिक पश्चिम), ज्येष्ठ नागरिक समाजमंदिर (सातपूर), जुनी शाळा, उत्कर्ष नगर (नाशिक पूर्व), एनएमसी बिल्डिंग, रंगारवाडा (नाशिक पश्चिम)