नाशिक (Nashik) : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मिर्ची हॉटेल चौकात मागील वर्षी ८ ऑक्टोंबरला झालेल्या भीषण अपघातानंतर शहरातील ब्लॅकस्पॉटचा प्रश्न समोर आला होता. मात्र, वर्षभरात महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग व नगररचना यांच्यात केवळ कागदी घोडे नाचवण्याच्या प्रकारांमुळे सर्व ब्लॅकस्पॉटची स्थिती जैसे थे आहे. यामुळे अखेर महापालिका आयुक्तांनी नगररचना व अतिक्रमण या दोन्ही विभागांना ब्लॅकस्पॉट दूर करण्यासाठी महिन्याची मुदत दिली आहे. यापूर्वी ब्लॅकस्पॉट हटवण्याबाबत अनेकदा मुदती देण्यात येऊनही काही फरक पडला नाही. यामुळे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या आदेशाला कसा प्रतिसाद मिळतो, याची प्रतीक्षा आहे.
छत्रपती संभाजी मार्गावरील हॉटेल मिरची लगत ८ ऑक्टोबर २०२२ रोजी बस अपघात होऊन १२ प्रवासी मृत्युमुखी पडले होते. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत घटनास्थळी भेट दिली. नाशिक शहरातील वाढत्या अपघातांची दखल घेऊन अपघात प्रवणक्षेत्रे अर्थात ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करून उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका व बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यानंतर महामार्ग प्राधिकरण, पोलिस, शहर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहन विभाग व महापालिका या सरकारी संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची रस्ते सुरक्षा समिती गठित करून शहरांतील अपघात प्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीने शहरांमध्ये २६ ब्लॅक स्पॉट असल्याचा अहवाल सादर केला.
यातील सात अपघातस्थळावरील अतिक्रमणे तातडीने हटवणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. महापालिकेकडून अपघातग्रस्त हॉटेल मिरची चौकातील अतिक्रमणे हटवण्यात आले. मात्र रस्त्याला लागून असलेली अतिक्रमणे हटवण्यात आली नाही. उर्वरित अतिक्रमणे हटवण्यासाठी डिमार्केशन होणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने अतिक्रमण विभागाने २३ जानेवारी २०२३, २० मार्च २०२३ तर ११ एप्रिल २०२३ रोजी असे तीन पत्रे दिले. मात्र, नगररचना विभागाने एकाही पत्राची दखल घेतली नाही व डिमार्केशन केले नाही. त्यामुळे १२ जून २०२३ ला पुन्हा चौथे स्मरणपत्र सादर केले होते. त्यानंतरही पुढे काहीही हालचाल झाली नाही.
या अपघाताची वर्षपूर्ती जवळ येऊनही याबाबत काहीच कार्यवाही न झाल्याने सप्टेंबरमध्ये आयुक्तांनी दोन्ही विभागांना तंबी दिल्यानंतर ब्लॅक स्पॉट अहवाल तयार करून १ ऑक्टोबरपासून ब्लॅक स्पॉटवरील अतिक्रमणांवर हातोडा चालवण्याचे जाहीर केले. मात्र, त्यानंतर महापालिका प्रशासनाने शडरातील ब्लॅकस्पॉटची नव्याने पाहणी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्रिसदस्यीय पथक स्थापन केले जाणार आहे. या त्रिस्तरीय पथकात अतिक्रमण, बांधकाम व नगररचना विभागातील प्रत्येकी एक अधिकारी समाविष्ट केले. या पथकाने पाहणी करून अहवाल देऊन त्यानंतर अतिक्रमण धारकांना नोटिसा दिल्या जाणार होत्या. या समितीने काय कार्यवाही केली, याबाबत अद्याप महापालिका प्रशासनाने जाहीर केले असून आता महापालिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी लक्ष घालत ब्लॅक स्पॉट हटवण्याच्या सक्त सूचना नगररचना विभागाला देत महिन्याभराचा अल्टीमेटम दिला आहे. शहरात एवढ्यामोठ्य भीषण स्वरुपाचा अपघात झाल्यानंतर महापालिकेने वर्षभरात केवळ त्या अपघात झालेल्या चौकातील अतिक्रमण हटवले आहे. आता उर्वरित २६ अपघात प्रवणक्षेत्रावर प्रत्येक ठिकाणी अपघात होण्याची महापालिका प्रशासन वाट बघत आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.