नाशिक (Nashik) : महापालिकेकडून उभारलेल्या स्वच्छतागृहांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सरकारच्या हागणदारीमुक्त उपक्रमास यामुळे हरताळ फासला जात आहे. देखभाल- दुरुस्तीचा अभाव आणि दैनंदिन स्वच्छतेचा अभाव यामुळे दुरवस्थेत भर पडत आहे. जुने नाशिक परिसरात विविध ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून उभारलेल्या स्वच्छतागृहांची दुरवस्था वाढत आहे. दैनंदिन स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरत आहे. भांडे तुटलेले, पाण्याची व्यवस्था नाही.
यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्ग शोधण्याची वेळ आली आहे. यामुळे रहिवाशांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. अशा वेळेस आरोग्याच्या समस्या अधिक जाणवत आहे. त्याचप्रमाणे फुले मार्केट या ठिकाणचे स्वच्छतागृह दुरवस्थामुळे असून नसल्यासारखे आहे. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसह व्यावसायिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बाजारपेठेत महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. बाजारपेठेत ठिकठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे फुले मार्केटमध्ये एकमेव महिला- पुरुषांसाठी स्वच्छतागृह आहे. त्याच्याही स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांकडून वापर टाळला जातो.
इतकेच नाही तर स्वच्छतागृहाबाहेरील चेंबरचे झाकण तुटले असल्याने दुर्गंधीत भर पडत आहे. भीमवाडी, दरबार रोड, फुले मार्केट, खडकाळी, कठडा, कुंभारवाडा, राजवाडा तसेच भद्रकाली टॅक्सी स्टॅन्ड परिसरातील स्वच्छतागृह अशा विविध स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. दरबार रोड येथील स्वच्छतागृह बंद झाले आहे. प्रवेशद्वारावरील भिंत पडून दुरवस्था झाली तर आहे. फुले मार्केटमधील स्वच्छतागृह तर व्यावसायिकांनी वर्गणीतून जमा झालेल्या पैशातून खासगी कामगाराच्या हाताने स्वच्छता करून घेतली. महापालिकेकडून सर्वच स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून स्वच्छता करावी, अशी नागरिकांकडून करण्यात आली आहे.