नाशिक (Nashik) : येथील रामघाटावर गोदावरी आरतीसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाठवलेल्या १२.६६ कोटींच्या प्रस्तावापैकी ११.६६ कोटींच्या प्रस्तावाला राज्यात सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने ११.६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या कामाचे अल्पकालावधीचे टेंडर प्रसिद्ध होऊन कार्यारंभ आदेश देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासन यांची घाई सुरू आहे.
दरम्यान, गोदावरीची आरती १९ फेब्रुवारीपासून होणार असल्याचा दावा केला जात असला तरी पुरोहित संघ व गोदावरी सेवा समिती यांच्यातील वादावर अद्याप तोडगा निघाला नसून टेंडरसाठी आग्रही असलेली मंडळी या आरतीच्या मानापमान नाट्वयाबाबत मौन धारण करून आहेत. वाराणशीतील गंगा आरतीप्रमाणे नाशिकमध्ये गोदावरी आरती व्हावी या संकल्पनेला राजय सरकारने पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वने व सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जानेवारी अखेरीस तत्काळ दहा कोटी मंजुरीची घोषणा करीत लवकराच लवकरच प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला १२.६६ कोटींचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्य वतीने २ फेब्रुवारीस राज्य सरकारकडे पाठवला होता. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्या प्रस्तावात एक कोटींची कपात करीत ११.६६ कोटींना ६ फेब्रुवारीस मंजुरी दिली आहे. यामुळे या आराखड्यातील कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आठ दिवसांची टेंडर प्रक्रिया राबवणार असून ५ मार्चपूर्वी कायार्रंभ आदेश देण्याची कार्यवाही करणार आहे.
या ११.६६ कोटींच्या निधीतून प्रामुख्याने गोदाघाटावर सहा ठिकाणी एलसीडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. गोदाघाटावर रात्रीच्या वेळी अंधार होत असल्याने एक भव्य हायमास्ट बसवण्यात येणार आहे. तसेच गोदावरीची आरती करण्यास भाविकांना उभे राहता यावे, यासाठी व्यासपीठ बनवण्यात येणार आहे. याशिवाय भाविकांना इतर सुविधा उभारल्या जाणार आहेत. गंगाघाटावर स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून यापूर्वी जवळपास ३५ कोटींची कामे केली आहेत. त्यात आता सांस्कृतिक मंत्रालयाच्या ११.६६ कोटी रुपयांची भर पडणार आहे. त्यामुळे या दोन्ही विभागांकडून कामांची द्विरुक्ती होण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.