नाशिक (Nashik) : नाशिक शहरातील पाणी चोरीचे पितळ उघडे करण्यासाठी स्काडामीटरची मदत होणार आहे. विशेष म्हणजे या मीटरमध्ये आधुनिक यंत्रणा असल्याने कार्यालयात बसून त्यांच्या पाण्याचा वापर तपासता येणार आहे. त्यामुळे पाण्याच्या वापराचे बिलींग कार्यलयातून करता येणार आहे. या स्काडामीटरमुळे पाण्याची चोरी थांबवता येणार असून मीटरशी कोणी छेडाछाड केल्यास त्याची माहिती मुख्यालयाला समजणार आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यात साडे तीन हजार व्यवसायिक ग्राहकांची निवड करून स्काडा वॉटर मीटर बसवण्यात आले आहेत.
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून निवासी, अनिवासी व व्यावसायिक अशा तीन गटांत पिण्याच्या पाण्याच्या नळजोडण्या दिल्या जातात. पाणी पुरवठा विभाग पाणी पुरवत असले तरी त्यावरील पाणीपट्टी वसुली कर संकलन विभाग करीत असतो. यात पारंपरिक मीटरमुळे पाण्याच्या वापराची व्यवस्थित नोंद न होणे, पाणीपट्टीअंदाजे आकारणे यामुळे पाणीपट्टी वापराप्रमाणे वसुली होत नाही व महापालिकेसाठी पाणी पुरवठा हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे. यामुळे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ‘स्काडा’ मीटर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यात पहिल्या टप्पात व्यावसायिक ग्राहकांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. दुसर्या टप्पात अनिवासी व त्यानंतर निवासी कनेक्शनच्या मीटरवर काम केले जाणार आहे. शहरात वितरित केले जाणारे पाणी व बिलांच्या माध्यमातून वसूल होणार्या पाण्याची गोळाबेरीज लागण्यासाठी हे मीटर उपयुक्त ठरणारे आहेत.
पाण्याच्या वितरणातील गैरवापर टाळण्यासाठी ७७०० व्यवसायिक ग्राहकांना आधूनिक स्काडा वॉटर मीटर लावण्यात येणार असून त्यापैकी ३५०० ठिकाणी मिटर लावण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणांवर लवकरच स्काडा मीटर बसवण्यात येणार असल्याने पाण्याच्या वितरणातील घोळ व होणारी चोरी समोर येण्यास मदत होणार आहे.
शहरात ३५०० स्काडा मीटर
शहरात व्यवसायिक कनेक्शनबाबत विचार केला जात आहे. त्यात ३५०० ठिकाणी स्काडा वॉटर मीटर बसवण्यात आलेले आहेत. उर्वरित ठिकाणी ते लवकरच लावले जाणार आहे. याद्वारे पाणी वापराची पूर्ण माहिती मिळणार आहे, असे महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून सांगण्यात आले.