नाशिक (Nashik) : पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची पाहणी केल्यानंतर महापालिकेने खड्डे बुजवण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे. महापालिका आयुक्तांनी उपअभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली खड्ड्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी विभागनिहाय सहा पथके स्थापन केली आहेत.
त्यानुसार या पथकांनी दिलेल्या अहवालातील खड्ड्यांची संख्या विभागासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदारांकडे दिली जाईल. त्यानंतर ठेकेदारांकडून तातडीने खड्डे बुजवले जाणार आहे. उन्हाळ्यात रस्ते खोदाईमुळे निर्माण झालेले खड्डे बुजवण्याबाबत गेल्या तीन महिन्यांपासून पडून असलेली फाईल आता मार्गी लागली असून खड्डे दुरुस्तीच्या कंत्राटाची वाट मोकळी झाल्याने या कामाला गती येणार आहे.
नाशिक शहरातील अनेक रस्त्यांची पावसाळ्यात चाळण झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी (दि. ५) रस्त्यांची पाहणी करत महापालिकेचे पितळ उघडे पाडले होते. शहरातील खड्डे पंधरा दिवसांत बुजवून नाशिक खड्डेमुक्त करावे, असे आदेशच पालकमंत्र्यांनी दिले. तत्पूर्वी आयक्त डॉ. अशोक करंजकर यांनीही रस्ते दुरुस्तीसाठी ११० कोटी रुपये मंजूर केले. व पालकमंत्र्यांची पुन्हा तक्रार येणार नाही या दृष्टिकोनातून रस्ते दुरुस्तीचे नियोजन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार बांधकाम विभागाने रविवारपासून (दि. ६) शहरातील सहा विभागातील प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे सर्वेक्षण सुरू केले. सर्वेक्षण करतानाच प्रत्येक विभागासाठी तीन ठेकेदार नियुक्त केले असून त्यांच्याकडून खड्डे बुजवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
३९ रस्ते वगळणार
रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या रस्त्याची देखभाल तीन ते पाच वर्षे करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते.महापापालिकेच्या ३९ रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारांवर आहे. यामुळे या रस्त्यांवरील खड्डे महापालिका बुजवणार नसून संबंधित ठेकेदारांकडून त्या रस्त्यांची दुरुस्ती करून घेतली जाणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी बांधकाम विभागाला तसे आदेश दिले आहेत.