नाशिक (Nashik) : नाशिककरांच्या मनोरंजनासाठी एकमेव स्थान असलेल्या दादासाहेब फाळके स्मारकाच्या विविध शुल्कामध्ये वाढ करण्यास महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. स्मारकातील प्रत्येक टप्प्याच्या दरात दुप्पट वाढ करण्यात आली आहे.
महापालिकेकडून १९९९ मध्ये चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाची २९ एकरात उभारणी केली. सुरवातीच्या काळात स्मारकातून उत्पन्न प्राप्त झाले. मात्र स्मारकांमधील विविध सेवांचे खाजगीकरण केल्यानंतर मात्र फाळके स्मारक हे पांढरा हत्ती पोसण्यासारखे झाले. त्यामुळे महापालिकेने संपूर्ण स्मारकाचेच खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एनडी स्टुडिओला कामदेखील देण्यात आले. परंतु तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सदर काम रद्द करण्याच्या सूचना दिल्यानंतर पुन्हा महापालिकेमार्फतच स्मारकाची देखभाल व दुरुस्ती सुरू आहे.
कोविडकाळात स्मारक पूर्णपणे बंद होते. जुलै व ऑगस्ट २०२२ मध्ये एकूण दोन लाख ६१ हजार उत्पन्न होते. परंतु याच दोन महिन्यात वीज व आस्थापना खर्च ४५ लाख ५० हजार रुपये इतका झाल्याने प्रतिदिन ७१ हजार ८७४ रुपये तोटा झाल्याचे कारण देत प्रशासनाने दरवाढ केली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
अशी आहे नवीन दरवाढ
अठरा वर्षाच्या आत पूर्वी प्रवेश शुल्क पाच रुपये होते. तो दर दहा रुपये करण्यात आला आहे. १८ वर्षाच्या पुढे दहा रुपये प्रवेश शुल्क होते. ते वीस रुपये करण्यात आले. वाहनतळासाठी पाच रुपयांऐवजी आता दहा रुपये मोजावे लागतील. तीन चाकी वाहनतळासाठीदेखील पाच रुपयांवरून वीस रुपये दर करण्यात आला. चारचाकी वाहनतळासाठी दहाऐवजी २० रुपये आता मोजावे लागतील. बस वाहनतळासाठी २० रुपये पूर्वी दर होता, तो आता ४० रुपये करण्यात आला आहे.
मिनी थिएटर वाहनतळासाठी हजार रुपये दर होता, आता दोन हजार रुपये करण्यात आला आहे. खुल्या रंगमंचासाठी एक हजार रुपये मोजावे लागत होते. आता दोन हजार रुपये मोजावे लागतील. कलादालन हॉलसाठी दोन हजार रुपये पूर्वी मोजावे लागत होते. आता चार हजार रुपये द्यावे लागतील. चित्रीकरणासाठी संपूर्ण परिसर हवा असल्यास तीन हजार रुपये पूर्वी दर होता, तो आता दुप्पट म्हणजे सहा हजार रुपये करण्यात आला आहे.