नाशिक (Nashik) : महापालिकेच्या जवळपास ३०० उद्यानांपैकी १३८ उद्यानांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांवर उद्यान विभागाने नोव्हेंबरमध्ये दंडात्मक कारवाई करून त्यांच्याविरोधात आठ लाख रुपयांचा दंड आकारला होता. त्याचप्रमाणे उद्यानांची देखभाल केल्याशिवाय त्यांना पुढील देयके न देण्याची भूमिकाही महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतली होती. त्यानंतर तीनच महिन्यात उद्यान विभागाने पुन्हा उद्याने देभखाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारांवर सोपवण्याची हालचाल सुरू केली आहे. यासाठी लवकरच टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे.
महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे उद्यान विभागाने म्हणणे आहे. नाशिक शहरात महापालिकेचे ५५० लहान मोठे उद्याने आहेत. या उद्यानांची देखभाल दुरुस्ती ठेवण्यासाठी उद्यान विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे उद्यान विभागाने जवळपास ३०० हून अधिक उद्याने देखभालीसाठी ठेकेदारांकडे दिली होती. उद्यानांच्या देखभालीसाठी महापालिकेकडून ठेकेदारांना दरमहा जवळपास ५२ लाख रुपयांचा निधी दिला द्यायचा. त्याबदल्यात वृक्षसंवर्धन, वाढलेले गवत कापणे, कचरा साफ करणे, उद्यानातील खेळण्यांकडे लक्ष देणे, अशा अनेक प्रकारच्या जबाबदान्या ठेकेदारांवर सोपवण्यात आलेल्या आहेत.
उद्यान देखभालीसाठी ठेकेदार केवळ नावाला बिगारी कामगार दाखवतात व देखभाल केल्याचे दाखवत ठेकेदार महापालिकेकडून दरमहा देयके घेतले जातात. उद्यान विभागातील वृक्ष निरीक्षकांकडूनही आलेल्या त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने उद्यानांमधील समस्यांमध्ये वाढच होत आहे. याबाबत स्थानिकांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत उद्यान विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी ठेकेदारांकडे देखभाल दुरुस्तीसाठी दिलेल्या उद्यानांची पाहणी केली होती. यावेळी १३८ उद्यानांमध्ये कोणतीही देखभाल केली जात नाही. तेथे कर्मचारी आढळून आले नव्हते. यामुळे त्यांनी या ठेकेदारांना आठ लाख रुपये दंडाची आकारणी केली.
या उद्यानांमधील त्रुटी दूर होत नाही, तोपर्यंत त्यांना पुढील देयके न देण्याच्याही त्यांनी विभगाला सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता तीन महिन्यांत पुन्हा उद्याने ठेकेदारांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेने या उद्यानांचे तीन गटात वर्गवारी केली आहे. त्यात महत्त्वाची उद्याने, कमी महत्त्वाची उद्याने आणि मनपानेच देखभाल करावयाची उद्याने अशी वर्गवारी असून त्यानुसार या उद्यानांची ठेकेदारामार्फत देखभालदुरुस्ती केली जाणार असल्याची माहिती उद्यान विभागाकडून देण्यात आली.