नाशिक (Nashik) : मिरची चौकात झालेल्या बस दुर्घटनेत १२ जणांचा बळी गेल्यानंतर रस्ते सुरक्षेबाबत जागे झालेल्या महापालिकेकडून आता अपघातांच्या ब्लॅकस्पॉटवर सात कोटी रुपयांच्या निधीतून ३३३ स्पीडब्रेकर बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. नवीन वर्षात स्पीड ब्रेकर्स बसवण्याचे काम केले जाणार असून शहरातील प्रमुख चौक, शाळा, सरकारी कार्यालये, धार्मिक स्थळांसह गर्दीच्या ठिकाणी स्पीडब्रेकर्ससह शहरातील रस्त्यांवल झेब्रा क्रॉसिंग, स्पीड टेबल, थर्मोप्लॅस्टिक पेंटने पट्टे मारणे, कॅट आय बसविणे, रोड मार्कर, हजार्ड मार्कर, सूचना फलक, नो पार्किंग फलक आदी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
छत्रपती संभाजी महाराज मार्गावरील हॉटेल मिरची चौकात मागील वर्षी ८ ऑक्टोबरला भीषण अपघात होऊन त्यात १३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मिरची चौकात गतिरोधक बसवण्याची मागणी रस्ते सुरक्षा समितीकडे प्रलंबित असल्याची बाब उघडकीस आली होती. त्यावरून रस्ता सुरक्षा समितीवर टीका झाली होती. यामुळे रस्ते सुरक्षा समितीने बैठक घेऊन शहरातून जाणारे महामार्ग, शाळा, सरकारी कार्यालये, महत्त्वाचे रस्ते, वळणाच्या ठिकाणी स्पीडब्रेकर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीकडे शहरात साडेपाचशे ठिकाणी स्पीडब्रेकर टाकण्ये प्रस्ताव आले होते. शहरात आधीच अनेक ठिकाणी अनाधिकृत स्पीडब्रेकर असून त्यांच्या चुकीच्या आकारमानामुळे छोटे-मोठे अपघात घडत असतात. या स्पीडब्रेकरमुळे वाहनचालकांना मान, पाठ, मणक्याचे गंभीर आजार होत असल्याच्या तक्रारी असल्याने या प्रस्तावंची छाननी करण्यासाठी उपसमितीची स्थापना करण्यात आली.
या समितीत महापालिकेचा उपअभियंता, प्रादेशिक परिवहन अधिकारी, शहर वाहतूक शाखेचा प्रत्येकी एक अधिकाऱ्यांसमवेत के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमधील डॉ. विलास पाटील, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. रवींद्र सोनोने यांचा समावेश होता. या उपसमितीने या सर्व प्रस्तावांचा अभ्यास करून व प्रत्यक्ष पाहणी करून ३३३ ठिकाणी स्पीडब्रेकर्ससह विविध उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचा अहवाल दिला होता. त्यानुसार आता महापालिकेकडून ७ कोटी रुपये खर्च करून नवीन स्पीड ब्रेकर व अन्य उपाययोजना केल्या जाणार आहेत. अन्य उपाययोजनांमध्ये प्रामुख्याने रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग, स्पीड टेबल, थर्मोप्लॅस्टिक पेंटने पट्टे मारणे, कॅट आय बसवणे, रोड मार्कर, हॅजार्ड मार्कर, सूचना फलक, नो पाकींग फलक, आदी उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेने निश्चित केलेल्या २३ ब्लॅकस्पॉटवर सिग्नल बसवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.