नाशिक (Nashik) : नाशिक शहरातील प्रमुख मार्गांवर महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या मोठमोठ्या गतिरोधकांमुळे अनेक अपघात होऊन नागरिकांना मनक्याचे विकार झाल्याच्या तक्रारी असताना नाशिक महापालिकेने शहरातील २८ ब्लॅकस्पॉटवर गतिरोधक उभारण्याचा निर्णय घेत त्यात भर घातली जाणार आहे.
शहरातील औरंगाबाद महामार्गावरील मिर्ची हॉटेल लगतच्या चौकात झालेल्या बस दुर्घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणेने अपघातांना आळा घालण्यासाठी गतिरोधकाची उपाययोजना निश्चित केली आहे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांसह प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीतील निर्देशांनुसार शहरांतील २८ ब्लॅक स्पॉट अर्थात अपघातप्रवण क्षेत्रांच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याचे निर्देश आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाला दिले आहेत.
नाशिक शहरातील लॉन्सरोडवरील हॉटेल मिर्ची चौकात ८ ऑक्टोबर रोजी बस दुर्घटना होऊन त्यात अनेकजण होरपळून मृत्यू पावले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी करत सर्व ब्लॅकस्पॉट दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी, महापालिका व पोलिस आयुक्तांना दिले होते. त्यानुसार मागील महिन्यात १० नोव्हेंबरला रस्ते दुरक्षा समितीची बैठक पार पाडली. त्या बैठकीत रेझिलिइन्ट इंडिया कंपनीचे राजीव चौबे यांनी सायंटीफिक स्टडी करुन पंधरा दिवसात अपघाती स्थळांचे सर्व्हेक्षण करुन आवश्यक उपाययोजनासंबंधिचा अहवाल सादर करा, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रीय तसेच राज्य महामार्ग व महापालिकेच्या रस्त्यांवर असलेल्या ब्लॅक स्पॉटवर पहिल्या टप्प्यात गतिरोधक बसवले जाणार आहेत.
नाशिक शहरातून जाणाऱ्या महामार्गांवरील वाहनांचा वेग कमी व्हावा, यासाठी महापालिकेने यापूर्वीच शहरात अनेक ठिकाणी मोठमोठे गतिरोधक बसवले आहेत. रात्रीच्या अंधारात या मार्गावरून वेगाने जाणाऱ्या वाहनांना गतिरोधकांचा अंदाज येत नाही. यामुळे ही वेगवान वाहने गतिरोधकांवर जोरदारपणे आदळतात. त्यामुळे वाहनांमधील प्रवाशी, चालक यांना जोरदार धक्का बसून पाठीचे व मनक्याचे विकार जडले आहेत. तसेच रात्रीच्या वेळी पुढच्या वाहन चालकाला अचानक गतीरोधक दिसल्यास त्याने वाहनाची गती कमी करताच, पाठीमागून येणारे वाहन त्याव आदळून अनेक अपघात झाले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांकडून ही गतिरोधक काढण्याची मागणी होत असताना महापालिकेने अपघात रोखण्यासाठी नवीन २८ ठिकाणी गतिरोधक उभारण्याचा घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
या ठिकाणी बसवणार गतिरोधक
एबीबी सिग्नल, सकाळ सर्कल, शरणपूर रोड सिग्नल, वेद मंदिर चौक, बळी मंदिर, रासबिहारी चौफुली, शिंदे गाव शिवार, द्वारका सर्कल, फेम सिग्नल, राहू हॉटेल सिग्नल, के. के. वाघ महाविद्यालय सिग्नल, जत्रा हॉटेल चौफुली, उपनगर नाका सिग्नल, चेहडी गाव फाटा, दत्त मंदिर सिग्नल, पळसे गाव बस स्टॉप, ट्रक टर्मिनल, आडगाव, तपोवन क्रॉसिंग, स्वामीनारायण चौफुली, जुना गंगापूर नाका, नांदूर नाका, मिरची हॉटेल सिग्नल, तारवाला नगर सिग्नल, गडकरी चौक सिग्नल, एक्सलो पॉईंट, एमआयडीसी सातपूर, सिद्धिविनायक चौक, कार्बन नाका याठिकाणी गतिरोधक उभारले जाणार आहेत.