नाशिक (Nashik) : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मदतीने महापालिकतर्फे पंचवटी व सिडको विभागात दोनशे खाटांचे रुग्णालय साकारले जाणार आहे. पंचवटी रुग्णालयाचा कच्चा आराखडा तयार झाला असून, प्रस्तावित रुग्णालयाची स्थळ पाहणी करण्यात आली.
मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरवातीला दोनशे खाटांचे रुग्णालय प्रस्तावित केले असताना आता त्यात शंभर खाटांची भर घालून ते ३०० खाटांचे करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते. हे रुग्णालय ३०० खाटांचे झाल्यास प्रस्तावित मालेगाव स्टॅण्ड परिसरातील जागा अपुरी पडणार असल्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून नवीन जागेचा शोध सुरू झाल्याचे समजते. दरम्यान आमदार राहुल ढिकले यांनी प्रस्ताव दिल्यानुसार महापालिका प्रस्ताव तयार करीत असताना, इतर राजकीय पदाधिकारी यात फाटे फोडत, तर नाही ना, असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.
राज्यात शिंदे व फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले यांनी पंचवटी विभागामध्ये तर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी सिडकोतील कामगार वस्ती लक्षात घेऊन रुग्णालय उभारण्याची मागणी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती. दोन्ही मागण्यांची दखल घेत पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार महापालिकेने प्रत्येकी दोनशे खाटांचे दोन रुग्णालयांचा प्रस्ताव तयार केला. यामध्ये एका रुग्णालयासाठी ५५ कोटी रुपये खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे.
महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील भांडाराची जागा रुग्णालयासाठी निश्चित करण्यात आली. रुग्णालय उभारले जाणाऱ्या प्रस्तावित जागेवर सध्या व्यावसायिक गाळे आहेत. या व्यावसायिकांना तळमजल्यावर गाळे देऊन रुग्णालयासाठी तीन मजली इमारत प्रस्तावित करण्यात आली. दरम्यान पंचवटीतील प्रस्तावित दोनशे खाटांऐवजी ३०० खाटांचे रुग्णालय करण्याच्या सूचना आल्याने महापालिका बांधकाम विभागाकडून रुग्णालयाचा आराखडा बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पंचवटी विभागात या आधीच महापालिकेचे दोन व धर्मदाय तत्वावरील तीन असे पाच रुग्णालय आहेत. शिवाय म्हसरुळजवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होत आहे. त्यात आता महापालिकेच्या नवीन रुग्णालयाची भर पडणार आहे.
सध्या प्रस्तावित केलेल्या तीनमजली रुग्णालयात सर्व प्रकारच्या आजारांचे निदान आणि उपचार करण्याबाबतचे वॉर्डस् असतील. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विभागाकडून आयुक्तांच्या मंजुरीने पंचवटी व सिडको येथील प्रत्येकी दोनशे खाटांच्या रुग्णालयांचा प्रस्ताव केंद्र व राज्य शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार होता. पण अचानकपणे पंचवटीतील प्रस्तावित रुग्णालयाची क्षमता दोनशे वरून तीनशे करण्याच्या सूचना आल्या आहेत. यामुळे पुन्हा नवीन आराखडा तसेच पुन्हा नव्या जागेचा शोध सुरू झाला असल्याचे महापालिकेतील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान आमदार राहुल ढिकले यांनी याबाबत सांगितले की, प्रस्तावित रुग्णालय ३०० खाटांचे करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे ऐकले आहे. सध्याची जागा २०० खाटांच्या रुग्णालयासाठीच पुरेशी आहे. आपण याबाबत काहीही सूचना दिल्या नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे महापालिकेचे अधिकारी कोणाच्या सूचना ऐकून प्रस्तावात बदल करीत आहेत, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.