नाशिक (Nashik) : बागलाण तालुक्यातील मोसम व आरम या दोन्ही नद्यांवर महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या २५ सिमेंट काँक्रिट बंधाऱ्यावरील स्थगिती उठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली. यामुळे मोसम व आरम या नद्यांवर २३ कोटी ९० लाख रुपयांच्या निधीतून २५ बंधारे उभारले जाऊन या गावांचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
राज्यात भाजप प्रणित सरकार असताना मोसम व आरम नद्यांवर २५ बंधारे बांधण्यास जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिली होती. पुढे महाविकास आघाडी सरकारने स्थगिती आणल्यामुळे प्रस्तावित बंधाऱ्यांचे कामे लालफितीत अडकली. मात्र याबाबत लवकरच शासन निर्णय निर्गमित होणार आहे.
आमदार दिलीप बोरसे यांनी सांगितले की, जलसंपदा विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे बागलाण तालुक्यात ठिकठिकाणी गेटेड सिमेंट कॉंक्रिट बंधारे होण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. या प्रस्तावांना जलसंधारण विभागाकडून प्रशासकीय मान्यताही मिळाली होती. मात्र, महाविकास आघाडी शासनाने या कामांना स्थगिती आणल्यामुळे प्रस्तावित बंधाऱ्यांचे काम लालफितीत अडकले होते.
राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्याने स्थगिती उठविण्याबाबत नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. याबाबत आमदार दिलीप बोरसे यांनी पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती उठवण्याबाबत तत्त्वतः मान्यता दिली आहे. लवकरच याबाबत शासन आदेश काढण्यात येईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
बागलाण तालुक्यात ठिकठिकाणी होणाऱ्या या बंधाऱ्यांमुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील शेती सिंचनाची सोय होणार आहे. सोबतच या परिसरातील पाणी टंचाई टाळण्यासही हातभार लागणार आहे.
गावनिहाय मंजूर बंधारे
साळवण : १
साल्हेर ४
अंतापूर : २
मानूर : ४
चौंधाणे : १
अंवासन : २
कंधाणे : १
मोराणे सांडस : १
भडाणे : २
सोमपूर : १
जायखेडा : १
खमताणे : १
वाठोडे (पिठवळ्या आंबा) : ३ वाठोडे (मोल्या पहाड) : १
वाठोडे (मिलकसाड) : १ वाठोडे (जोगदरा) : १
वाठोडे (साळवण) : १