नाशिक (Nashik) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांनी जवळपास ११ हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार महापालिकेतर्फे शहरात साडेतीनशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यासह तपोवनातील ७०० एकर साधुग्राम भूमसंपादन करून विकसित करणे आदी कामे केली जाणार आहेत. या कामांचे सर्वेक्षण करून सविस्तर प्राकलन करण्यासाठी महापालिकेने सल्लागार सर्वेक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने राज्यस्तरीय शिखर समिती व जिल्हास्तरीय समिती, अशा दोन समित्यांची स्थापना केलेली आहे. नाशिक महापालिका व त्र्यंबकेश्वर नगरपालिका यांनी तयार केलेल्या अहवालांना या समित्यांच्या माध्यमातून मान्यता दिली जाणार आहे.
नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिका पालक संस्था म्हणून काम पाहणार आहे. सिंहस्थाच्या दृष्टीने पायाभूत सेवा सुविधा पुरवण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे. यामुळे महापालिकेच्या सर्व ४२ विभागांनी मिळून जवळपास अकरा हजार कोटींचा प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे.
शासनाने अद्याप या आराखड्याला मंजुरी दिलेली नाही. महापालिकेच्या आराखड्यात बांधकाम, पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, विद्युत, उद्यान या विभागाशी संबंधित कामे आहेत. विविध रस्त्यांचे व घाटांचे रुंदीकरण, नदी नाल्यांची साफसफाई, मलनिस्सारण केंद्रांची उभारणी, पाणीपुरवठा विषयक कामे, विद्युत खांबांचे सर्वेक्षण, झाडांचे सर्वेक्षण, साधुग्राम सर्वेक्षण, आराखडातयार करणे, त्याच्या हद्दी निश्चिती करणे.
अंतर्गत व बाह्य वाहन तळांचे सर्वेक्षण करणे त्याचा नकाशा तयार करणे, विविध जागा आरक्षित करणे, तात्पुरत्या स्वरुपात जागांचे अधिग्रहण करणे यासाठी सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. त्यासाठी सर्वेक्षक कंपनीची नियुक्ती करण्यास महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली आहे.
या कामांचे होणार सर्वेक्षण
- साधूग्रामसाठी ७०० एकर जागा भूसपादन
- ३५० किलोमीटर लांबीचे रस्ते.
- अंतर्गत व बाह्य वाहन तळांचा विकास.
- जलशुद्धीकरण केंद्रे
- मलनि:स्सारण केंद्र
- रुग्णालय पोलिस ठाणे, मंदिरे व मलनि:स्सारण केंद्रे