नाशिक (Nashik) : नाशिक ते पेठ (Nashik To Peth) या मार्गावर नाशिक महापालिका (NMC) हद्दीत राऊ हॉटेल ते तवली फाटा या रस्त्याची २.३० कोटी रुपये खर्च करून केलेल्या दुरुस्तीचे रिमझिम पावसातच पितळ उघडे पडले आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, पावसाळ्याच्या सुरवातीलाच अशी अवस्था झाल्याने यावर्षीही वाहनचालकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार असे दिसत आहे. ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या टक्केवारीत अडीच कोटींचे डांबर वाहून गेले, अशी चर्चा होत आहे.
नाशिक ते पेठ या रस्त्याचा सहा किलोमीटर भाग नाशिक महापालिकेच्या हद्दीत आहे. या हद्दीच्या पलिकडील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण झालेले आहे. नाशिक महापालिका हद्दीतील रस्त्याचे मजबुतीकरण महापालिकेने मधल्या काळात केलेले नसल्याने मागीलवर्षी या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. खड्डे चुकवण्याच्या नादात या रस्त्यावर अनेक अपघात झाले. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी रुंदीकरण व्हावे, यासाठी या भागातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली.
यामुळे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी या रस्त्याचे स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून काँक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यासाठी महासभेची परवानगीही घेतली. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीची नवीन कामे प्रस्तावित करण्याची मुदत संपली असल्याचे कारण देत हे काम करण्यास नकार दिला. स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून पेठरोडचे कॉंक्रिटीकरण होण्याचा मार्ग बंद झाल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने २.३० कोटी रुपयांच्या निधीतून या रस्त्याची डागडुजी करण्याचा मार्ग काढला. त्यानुसाठी रस्त्याची दुरुस्ती झाली. मात्र, पहिल्या पावसानंतर रस्ता उखडण्यास सुरवात झाल्याने या रस्ता कामाचा दर्जा वादात सापडला आहे.
यावर्षी पाऊस नाशिकवर रुसला असून, आतापर्यंत जेमतेम दोन तीन दिवस पाऊस झाला आहे. इतक्या कमी पावसामुळे या रस्त्यावर पुन्हा मोठे खड्डे पडल्याने स्थानिक नागरिकांना धुळीचा आणि वाहनचालकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
नाशिकहून गुजरातकडे पेठमार्गे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात लहान - मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असते. तीन दिवस पडलेल्या पावसामुळे जर असे बुजविलेले खड्डे पुन्हा दिसत असतील तर ठेकेदाराने कशा पद्धतीचे काम केले याची चौकशी करत ठेकेदारावर तसेच महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.