नाशिक (Nashik) : कळवण शहरात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रस्ताकामामुळे वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. यामुळे अनेकदा अपघात झाले असून दोन दिवसांपूर्वीही दोघांना प्राण गमवावे लागले. कोणतीही अडचण नसताना संबंधित ठेकेदाराकडून काम करण्यास उशीर होत असून, आतापर्यंत त्याला दोनदा मुदतवाढ देऊनही का अपूर्ण आहे. याबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने एचएमपी बिल्डकॉन प्रा. लि. या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू केली आहे.
केंद्र सरकारच्या निधीतून कळवण शहरात हायब्रीड अम्युनिटी मॉडेल (हॅम) अंतर्गत तीन वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी संबंधित ठेकेदाराला तीन वर्षापूर्वी कार्यारंभ आदेश दिले होते. त्यानंतर कोरोनाचे कारण सांगत संबंधिताने काम पूर्ण कऱण्यास उशीर केला आहे. एकच काम तीन वर्षांपासून सुरू असल्याने या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालकांना वाहन चालवण्याची कसरत करावी लागत आहे. त्यातच अनेकदा अपघात झाले आहेत. यामुळे या रस्ता कामाविरोधान नागरिकांच्या मनात असंतोषाची भावना आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावर बसच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. यामुळे नागरिकांनी निषेध करीत रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे आमदार नितीन पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करीत, या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र दिले आहे, असे उत्तर दिले. तसेच पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे, असे उत्तर दिले. यामुळे पालकमंत्र्यांचाही थोडावेळ संभ्रम झाला. या कामास तीन वर्षे का लागलीत, याबाबत पालकमंत्र्यांनी प्रश्न विचारल्यानंतर अधीक्षक अभियंत्यांनी केंद्र सरकारच्या कोरोना काळातील मार्गदर्शक सूचनांमुळे काम बंद होते, असे उत्तर दिले. त्यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अशा कोणत्याही सूचना नव्हत्या.उलट केंद्राच्या भूपृष्ठ व वाहतूक मंत्रालयाने रस्ते बांधकामाचे विक्रम याच काळात केल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. अधिकारी चुकीची माहिती देत असल्यामुळेच कळवणला माझ्याविरोधात आंदोलन केले जात असल्याचा आरोप करीत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या मुद्याला कळवणमधील स्थानिक राजकारणाचे संदर्भ असल्याचे लक्षात येताच, पालकमंत्र्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश देत चर्चेला पूर्णविराम दिला. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने एचएमपी बिल्डकॉन प्रा. लि.या ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.