नाशिक (Nashik) : जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून नाशिक जिल्ह्यातील बचत गटांनी उत्पादित केलेला माल विक्रीसाठी त्यांना जवळपास ८० फॅब्रिकेटेड शॉप देण्याचा निर्णय पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ३.३७ कोटी रुपयांच्या या योजनेला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या फॅब्रिकेटेड शॉप प्रत्येक तालुक्यातील बचत गटांना दिल्या असून तेथे त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तुंची विक्री करता येणार आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात २५ हजार बचत गटांची स्थापना केली असून त्यातील आठ ते नऊ हजार महिला बचत गट सक्रिय असून ते तयार कपडे, पापड, लोणचे, कुरडया, मसाले, हळद, तूप, गूळ, बिस्किटे, नागली, बाजरी, ज्वारी, यावर प्रक्रिया केलेल्या वस्तू तसेच एमिटेशन ज्वेलरी, असे वेगवेगळे उत्पादन घेऊन त्याची विक्री करण्याचा प्रयत्न करीत असतात. बचत गटांना उद्योग उभारण्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून सरस सारखी प्रदर्शने भरवून प्रोत्साहन दिले जात असले, तरी त्यांना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे बचत गटांच्या उत्पादनांमध्ये सातत्य असत नाही. जिल्हयातील महिला बचत बचत गटांच्या उत्पादनांचा एक ब्रॅण्ड तयार होऊन त्यांच्या उत्पादनांना कायमस्वरुपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. गोदाकार्ट ही ऑनलाईन विक्री प्रणाली विकसित करण्यात आली आहे. नुकतेच पेठ येथील बचत गटाला राज्य सरकारची नागली डोसा प्रिमिक्सची २५ लाख रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने ऑगस्टमध्ये बचत गटांच्या निधीतून नाशिक पंचायत समितीमध्ये एक फॅब्रिकेटेड शॉप उभारण्यात आले आहे. याठिकाणी बचत गटाच्या महिलानी तयार केलेला तत्व या ब्रॅण्डच्या नावाने साड्यांची विक्री केली जाते. या शिवाय बचत गटांनी तयार केलेली उत्पादने विक्रीसाठी ठेवली आहेत. याला ग्राहकांचा चांगला प्रतिसादा मिळत आहे. या फॅब्रिकेटेड शॉपचे उद्घाटन दोन महिन्यापूर्वी पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्हाभरातील बचत गटाच्या महिलांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू स्थानिक पातळीवर विक्रीसाठी कायमस्वरुपी सुविधा देण्यासाठी फॅब्रिकेटेड शॉप देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी दोन प्रकारचे फॅब्रिकेटेड शॉप देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हयातील प्रमुख महामार्गांवर पर्यटकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी दहा मोठे शॉप देण्याचा तसेच स्थानिक पातळीवर लहान आकाराचे ७५ शॉप देण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या आकाराच्या एका शॉपची किंमत साडेसात लाख रुपये प्रस्तावित करण्यात आली असून लहान शॉपची किंमत ३.७५ लाख रुपये असणार आहे. या महिला बचत गटांना फॅब्रिकेटेड शॉपबरोबरच वजन काटा, वीज जोडणी दिली जाणार आहे. यासाठी लवकरच टेंडर प्रक्रिया राबवली जाणार असून बचत गटांना स्थानिक पातळीवर वस्तू विक्रीसाठी हे शॉप उपयोगी ठरतील, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतीभा संगमनेरे यांनी सांगितले.