Nashik Delhi Flight News नाशिक (Nashik) : नाशिककरांना वर्षभरापासून प्रतीक्षा असलेली नाशिक-दिल्ली विमानसेवा एक मे रोजी महाराष्ट्र दिनी सुरू झाली. या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून प्रवासी क्षमतेच्या जवळपास ८० टक्के प्रवासी रोज या विमानाने प्रवास करीत आहेत.
नाशिक येथील ओझर विमानतळावरून देशातील प्रमुख शहरांना जाण्यासाठी विमानसेवा उपलबध असली, तरी वर्षभरापासून देशाची राजधानी नवी दिल्लीला जाण्यासाठी थेट विमानसेवा उपलब्ध नव्हती.
धार्मिक पर्यटन, उद्योगांसाठी कच्चा माल, केंद्रीय मंत्री, सचिव वा अन्य अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, व्यवसायवृद्धी, कॉर्पोरेट बैठका, आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी आदी अनेक कारणांसाठी नाशिककरांना सातत्याने दिल्लीला जावे लागते. मात्र, गेल्या वर्षी 'स्पाइस जेट'ची दिल्ली विमानसेवा बंद पडल्यावर नाशिककरांना हवाईमार्गे दिल्ली गाठता येत नव्हती. त्यामुळे ही सेवा सुरू करावी, अशी मागणी उद्योग व पर्यटन क्षेत्रातील संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी 'इंडिगो'कडे केली होती.
कंपनीने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि १ मे पासून नाशिक-दिल्ली थेट विमानसेवा सुरू करण्यात आली. या विमानसेवेचे पहिले उड्डाण बुधवारी (ता. १) सकाळी ६.५५ ला दिल्ली येथून विमानाने भरारी घेतली आणि ठीक ८.५० वाजता ते ओझर विमानतळावर दाखल झाले. या विमानाला हवाई क्षेत्रातील प्रथेप्रमाणे 'एचएएल'च्या वतीने पाण्याच्या फवाऱ्यांनी सलामी देण्यात आली.
यावेळी 'एचएएल'चे मुख्य कार्यकारी अधिकारी संकेत चतुर्वेदी, सरव्यवस्थापक सुब्रत मंडल, विमानतळ संचालक विलास आव्हाड, व्यवस्थापक नितीन सिंग, 'निमा'चे सहसचिव मनीष रावल यांनी वैमानिक आणि विमान कर्मचाऱ्यांचे स्वागत केले.
आता रोज सकाळी ६-५५ ला नवी दिल्ली येथून निघालेले विमान सकाळी ८.५० ला नाशिकला पोहोचेल. हेच विमान सकाळी ९.२० वाजता नाशिकहून भरारी घेऊन ११.१५ वाजता दिल्लीला पोहोचेल.