नाशिक (Nashik) : आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या वासाळी (ता. इगतपुरी) येथील स्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ४८३ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकारातून या स्मारकाबाबत पवार यांच्या दालनात आज (ता. २८) बैठक झाली. या स्मारकाच्या कामासोबतच महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसुबाई शिखरापर्यंत रोप वे उभाण्याच्या कामाचाही या आराखड्यात समावेश आहे.
ब्रिटिशांच्या विरोधात १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याच्या आधी नाशिक व नगर परिसरात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी लढा उभारला होता. त्यांचे जन्मगाव असलेल्या इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये स्मारक उभारण्यात यावे, यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या प्रयत्ननातून तेथे स्मारक मंजूर झाले आहे. त्यावेळी झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यात ३८८ कोटी ८४ लाख रुपयांचे स्मारक उभारणे व दुसऱ्या टप्प्यात उर्वरित काम करण्यासाठी ९६ कोटी रुपये इतक्या रकमेस मंजुरी देण्याचे निश्चित करण्यात आले होते.
त्याचबरोबर या स्मारकाच्या ठिकाणापासून जवळच असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी रोप वे उभारण्याबाबत चर्चा झाली होती. या रोपवेच्या कामाचा स्वतंत्र सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेतून मंजुरीसाठी पाठवण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या.
या रोप वे कामाला मंजुरी देऊन निधी देण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेले आहे. यामुळे आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारक व रोप वे या दोन्ही प्रकल्पांच्या ४८३ कोटी रुपयांच्या आराखड्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे.
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, दिलीप वळसे पाटील, आमदार कोकाटे, नितीन पवार, मंजुळा गावित, नितीन भुसारा, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता, वास्तुविशारद देशपांडे आदी उपस्थित होते.
आदिवासी विकास विभाग देखभाल करणार
बैठकीत स्मारक पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कोण स्वीकारणार, असा मुद्दा समोर आला. त्यावर ही जबाबदारी आदिवासी विभागाकडे देण्याचा निर्णय झाला. तसेच या स्मारकाच्या कामकाजासाठी समिती तयार करण्याचा निर्णय होऊन पर्यटन, ग्रामविकास या विभागांचे सचिव, वास्तुविशारद, आदिवासी भागाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार, जिल्हाधिकारी यांचा समितीत समावेश असणार असणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात आज झालेल्या बैठकीत अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकातून आदिवासी बांधवांची अस्मिता जपली जाणार आहे. तसेच रोप वेमुळे या भागात पर्यटनवृद्धी होऊन आदिवासी बांधवांना रोजगारही मिळणार आहे.
- माणिकराव कोकाटे, आमदार