नाशिक (Nashik) : महापालिकेने (NMC) स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत इलेक्ट्रिक वाहनांना (EV) प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग स्टेशनचा (Charging Stations) उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाअंतर्गत शहरात १०६ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात ५७ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. नवी दिल्लीच्या युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) अंतर्गत २२, तर एन कॅप अर्थातच नॅशनल क्लिनर पॉलिसीअंतर्गत ३५ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. यामुळे शहरातील इलेक्ट्रिक बससह इतर वाहनांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.
केंद्र व राज्य शासनाने सरकारी वाहनेही खरेदी करताना इलेक्ट्रिक पर्याय निवडण्याचे आदेश दिले आहे. यासंदर्भात धोरण ठरवले जात आहे. दुसरीकडे, इलेक्ट्रिकल वाहनांना प्रोत्साहन देताना जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशनही उभे करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेत दिल्ली येथील यूएनडीपीने मदतीचा हात पुढे केला आहे. शहरात २२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी निधी देण्याची तयारी यूएनडीपीने दर्शविली आहे. त्यानुसार त्यांना २२ ठिकाणांची यादी देण्यात आली आहे.
आता महापालिकेच्या जवळपास ३५ जागांवर एन कॅप योजनेंतर्गत चार्जिंग स्टेशनसाठी प्रस्ताव तयार करत आहे. त्यासाठी राज्य शासनाचे सेवानिवृत्त सचिव दीपक म्हैसकर यांच्या उपस्थित आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये दोन्ही योजनातून निधी कसा मिळवायचा, तसेच यासाठी इस्टिमेट कसे तयार करायचे यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.
या ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन्स
राजीवगांधी भवन, मनपापूर्व, पश्चिम, नवीन, नाशिकरोड, सातपूर, पंचवटी सहाही विभागीय कार्यालये, बिटको हॉस्पिटल, झाकीर हुसेन हॉस्पिटल, महाकवी कालिदास कलामंदिरासमोरील पार्किंग, इच्छामणी मंगल कार्यालयालगत, उपनगर, आरटीओ कॉलनीलगत बोधलेनगर, लेखानगर, गंगापूररोडवरील प्रमोद महाजन उद्यान, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक तसेच महात्मानगर क्रिकेट मैदान, फाळके स्मारक, गणेशवाडी भाजीमार्केट, रामसृष्टी उद्यान, रामदास कॉलनी गार्डन कॉलेजरोड, तपोवन बस डेपो, राजेसंभाजी स्टेडियम तसेच अन्य पालिकेच्या काही जागा शोधून त्यावर इलेक्ट्रिक वाहनचार्जिंग स्टेशन्स उभारले जाणार आहेत.
प्रदूषणमुक्तीसाठी केंद्र व राज्य शासनाने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर केले आहे. इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणे गरजेचे असून त्यासाठी महापालिका पहिला टप्यामध्ये ५७ जागा उपलब्ध करून देत असून केंद्र शासनाच्या एन कॅप आणि यूएनडीपी या योजनेतून जागा उपलब्ध दिल्या जाणार आहेत, असे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, यांनी सांगितले.