नाशिक (Nashik) : स्पाइस जेट (Spice Jet) कंपनीकडून चालवली जाणारी दिल्ली - नाशिक विमानसेवा (Delhi - Nashik Flight) आजपासून (१८ एप्रिल) २० ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी जेट एअरवेज (Jet Airways) बंद पडल्याने पहिल्यांदा दिल्ली सेवा बंद पडली. त्यानंतर अलायन्स एअरची सेवा बंद पडली. आता स्पाईस जेटची सेवाही अडखळत आहे. कंपनीकडे पुरेशी विमाने नसून उपलब्ध असलेल्या विमानांची मेंटेनन्सची कामे प्रदीर्घ काळ चालणार आहेत. यामुळे ही विमानसेवा बंद राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
नाशिकच्या ओझर विमानतळावरून सध्या इंडिगो कंपनीकडून हैदराबाद, गोवा, अहमदाबाद, नागपूर या शहरांकरिता विमानसेवा पुरवली जात आहे. स्पाइस जेटची नाशिक-दिल्ली ही सेवा सुरू होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून ही सेवा विस्कळीत झाल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर महिनाभरापासून ही सेवा एक दिवसा आड सुरू होती. यावरून ही सेवा कधीही बंद पडू शकते असा अंदाज व्यक्त होत असताना पुरेशी विमाने नसल्याचे कारण देत, ही सेवा कंपनीने बंद केली आहे.
कंपनीकडे असलेल्या अनेक विमानांचे सध्या मेंटेनन्सचे काम सुरू असून चीनमधून येणारे काही स्पेअरपार्ट्स येण्यासाठी लागलेल्या उशिरामुळे हा मेंटेनन्स लांबल्याचेही सांगितले जात आहे. कारण काहीही असले तरी ही विमानसेवा बंद झाल्यामुळे नाशिकच्या नागरिकांची गैरसोय होणार हे निश्चित. यामुळे ऑगस्टपर्यंत नाशिककरांना दिल्लीला जाण्यासाठी शिर्डी विमानतळ गाठावे लागणार आहे.
शिर्डी विमानतळावरून स्पाइस जेटचे दुपारी २.३५ आणि इंडिगोची सायंकाळी ६.०५ ला अशा दोन फ्लाइट आहेत. तसेच मुंबई विमानतळाचा पर्याय उपलब्ध आहे. ऐन पर्यटन हंगामात ही सेवा प्रदीर्घ काळ रद्द केल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातून दिल्लीला जाणारे प्रवासी, उद्योजक, पर्यटक यांच्यात नाराजीचा सूर पहायला मिळत आहे.
पुरेसे प्रवासी असतानाही स्पाइस जेटकडून सेवा बंद झाल्याने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि खासदार हेमंत गोडसे यांच्या भूमिकेकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. ऐन पर्यटनाच्या हंगामात सेवा बंद झाल्याने ट्रॅव्हल कंपन्यांचे नियोजन ढासळणार आहे.