नाशिक (Nashik) : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराबाहेरून उभारल्या जाणाऱ्या ५६ किलोमीटरच्या रिंगरोडचे (Ring Road) सर्वेक्षण करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी घेतला आहे.
या प्रस्तावित रिंगरोडसाठी सर्व्हे करण्यासाठी पुणे येथील मोनार्च या सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या रिंगरोडचे नामकरण 'सिंहस्थ परिक्रमा मार्ग' असे करण्यात आले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार आल्यावर नाशिककरांसाठी पहिला सकारात्मक निर्णय झाला आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेकडून नियोजन सुरू झाले आहे. यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही तयार करण्यात आली आहे. या समितीने सूचवल्यानुसार महापालिकेने बाह्यवळण रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव शासनाला दिला आहे.
यानुसार जवळपास ५६ किलोमीटर लांबीचा रिंगरोड दोन टप्प्यात तयार करण्याचा प्रस्ताव आहे. रिंगरोड तयार करण्यासाठी जवळपास २६५ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करावे लागणार आहे. या भूसंपादनापोटी जमीन धारकांना रोख स्वरूपात मोबदला देण्याची महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाही.
टीडीआर स्वरूपात मोबदला दिल्यास भविष्यात टीडीआरचे भाव कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे जमीन धारक हा प्रस्ताव स्वीकारणार नसल्याचे साशंकता निर्माण झाली. यामुळे महापालिकेने रिंगरोड उभारण्यासाठी राज्य शासनानेच निधी देण्याची मागणी केली.
पालकमंत्री दादा भुसे याबाबत पाठपुरावा करीत असतानाच राज्यात मंत्रिमंडळाच्या फेरबदलात त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचा कारभार आला आहे. यामुळे मंत्री भुसे यांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्या संदर्भातील प्रस्ताव महापालिकेला पाठविण्याचे निर्देश त्यांनी मागील आठवड्यात दिले होते.
महापालिकेने रस्ते विकास महामंडळाला प्रस्ताव सादर केल्यानंतर रिंगरोड कामाला गती मिळाली असून, पुणे येथील मोनार्च या सल्लागार संस्थेची नियुक्ती सर्वेक्षणासाठी करण्यात आली आहे. संस्थेच्या माध्यमातून रिंगरोडचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
असा आहे रिंगरोड...
मुंबई आग्रा महामार्गालगतच्या महापालिका खत प्रकल्पापासून पाथर्डी शिवारातून वालदेवी नदीला समांतर पिंपळगाव खांब शिवार, तसेच पुढे वालदेवी नदी पलीकडे विहीतगाव शिवार, विहितगावपासून पुढे नाशिक-पुणे महामार्ग ओलांडून चेहेडी शिवारातून पंचक गाव पुढे माडसांगवी शिवारातून महापालिका हद्दीबाहेर छत्रपती सभाजीनगर रोडलगत आडगाव शिवार व ट्रक टर्मिनसपर्यंत साठ मीटर रुंदी व २६ किलोमीटर लांबीचा पहिला रिंगरोड आहे.
आडगाव ट्रक टर्मिनस येथून ३६ मीटर रुंदी व ३० किलोमीटर लांबीचा दुसरा रिंग रोड आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, जलालपूर, बारदान फाटा, गंगापूर रोड, सातपूर एमआयडीसी, त्र्यंबक रोड व पुढे गरवारे पॉइंटपर्यंत असा आहे.