नाशिक (Nashik) : येथे झालेला २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव व त्यानिमित्त नाशिकला आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे कार्यक्रम यासाठी प्रशासनाकडून मोठ्याप्रमाणावर खर्च करण्यात आला. या महोत्सवासाठी राज्य व केंद्र सरकारकडून ६० कोटी रुपये निधी आला होता. मात्र, त्यातील बहुतांश कामे महापालिका, जिल्हा प्रशासन व क्रीडा विभागाच्या माध्यमातून करण्यात आली. अवघ्या चार ते पाच दिवसांत करोडो रुपये खर्च झाल्यावर त्या खर्चाचा हिशेब सरकारकडून मागविला जाणार असून, तशा सूचना यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. यामुळे आलेल्या निधीच्या विनियोगाबाबतचा हिशेब करण्याच्या कामाला प्रशासन लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मागील आठवड्यात नाशिक दौरा झाला. प्रारंभी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन व जाहीर सभा एवढ्यापुरता दौरा निश्चित होता. त्यानंतर रोड-शो, श्री काळाराम मंदिर दर्शन, गंगाघाटावर गोदापूजन हे तीन नवीन कार्यक्रम जोडले गेले. त्यामुळे हेलिपॅडपासून ते मोदी मैदानापर्यंत जाणारे रस्ते चकचकीत करण्यात आले. त्याचप्रमाणे गंगाघाट परिसर, श्री काळाराम मंदिर परिसर येथेही परिसर चकाचक करण्यात आला.
राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी राज्य व केंद्राच्या युवक व क्रीडा विभागाकडून ६० कोटी रुपये निधी मंजूर झाला होता. त्यातून शहरात विविध प्रकारची कामे करण्यात आली. रोड शो दरम्यान झाडांवर झेंडूच्या फुलांच्यामाळा लावणे, रस्ते दुरुस्ती, नवीन रस्ते तयार करणे, गोदाघाट परिसरात रामायण प्रसंगातील चित्र रेखाटने, नदी घाट स्वच्छता, दुभाजकांची रंगरंगोटी, पथदीपांवर तिरंगी एलईडी लाइट लावणे, रामकुंडावर कृत्रिम लॉन्स टाकणे, सजावट, रस्ते धुणे, वाहतूक बेटाची साफसफाई, बोर्ड रंगवणे, होर्डिंग्ज लावणे आदी अनेक प्रकारची कामे महापालिकेच्या यंत्रणेकडून करण्यात आली.
तसेच युवक व क्रीडा विभागाकडून युवा महोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी युवाग्राम उभारणे, उद्घाटन कार्यक्रमासाठी सभेसाठी तयारी करणे, शहरातील प्रमुख सभागृह परिसरात स्पर्धांची तयारी करणे, सभागृह भाडेतत्वावर घेणे, आलेल्या स्पर्धकांच्या येण्याजाण्यासाठी वाहन व्यवस्था करणे, निवासासाठी हॉटेल बूक करणे आदी कामे करण्यात आली.
या कार्यक्रमानिमित्त मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी केल्या. तसेच काही वस्तू भाडे तत्त्वावरही घेण्यात आल्या होत्या. या वस्तुंची खरेदी किंमत तसेच वस्तुंचे लावलेले भाडे दर याचाही हिशोब मागितला जाणार असल्याने हिशेब तसेच कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याचे काम सध्या प्रशासनाकडून सुरू आहे.
युवा महोत्सव कार्यक्रमाचे ठिकाण ऐनवेळी जाहीर करण्यात आल्याने प्रशासनाकडे निधी खर्च करण्याच्या पारंपरिक बाबींचे पालन करण्यास पुरेसा वेळ नसल्याने ती कामे घाईघाईमध्ये मंजूर करून पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व कामांना व खर्चाला आता कार्येात्तर मंजुरी घेतली जाणार असल्याने शासनाकडून खर्चाची यादी मागवली जाणार आहे.
खर्चासाठी क्रीडा मंत्रालयाकडून विशेष निधी मंजूर झाला. या निधीतून महापालिकेने केलेल्या खर्चापोटी निधी वर्ग केला जाणार आहे. सढळ हाताने खर्च झाला असला तरी वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रकार होऊ नये व अशा कामांमुळे केंद्र सरकारकडे बोट दाखवले जाऊ नये, यासाठी खर्चाचा काटेकोर हिशोब ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने आता राज्य सरकारकडे खर्चाचा हिशोब सादर करावा लागणार आहे. त्यानंतर राज्य सरकार केंद्रीय क्रीडा व युवा मंत्रालयाला हिशोब सादर केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.