नाशिक (Nashik) : महापालिकेकडून (NMC) चालवल्या जाणाऱ्या सिटी लिंक (Citi Link Bus) या बस सेवेला पहिल्या वर्षी ३० कोटी रुपये तोटा झाल्यानंतर मागील वर्षी म्हणजे २०२२-२३ मध्ये हा तोटा ४५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पहिल्या वर्षी बसची संख्या कमी असल्यामुळे तोटा कमी होता. यावर्षी महापालिका आणखी बस खरेदी करणार असल्याने या आर्थिक वर्षात हा तोटा आणखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
महापालिकेने २०२१ मध्ये सिटीलिंक कंपनीच्या माध्यमातून शहर बस सेवा सुरू केली आहे. सध्या सिटीलिंक कंपनीकडे २४० बसेस आहेत. या बसेस ठेकेदाराच्या माध्यमातून चालवल्या जातात. ठेकेदाराला दिली जाणारी रक्कम व इतर प्रशासकीय खर्च याचा विचार करता एक बस चालवण्यासाठी प्रति किलोमीटर ७५ रुपये खर्च येत आहे. मात्र, प्रवाशी वाहतुकीतून सिटी लिंकला केवळ ५० रुपये प्रति किलोमीटर महसूल मिळत आहे. सिटीलिंक बस सेवा चालवल्याने महापालिकेला प्रति किलोमीटर २५ रुपयांचा तोटा सहन करावा लागतो.
महापालिकेने ही सेवा सुरू केली त्या २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात ३० कोटींचा तोटा झाला होता. उत्पन्नातील ही तूट कमी करण्यासाठी सिटीलिंक कंपनीने प्रवासी वाहतुकीचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नाशिक महापालिका हद्दीबाहेर बससेवा सुरू केली व प्रवास भाड्यातही वाढ केली.
या उपाययोजना करूनही दैनंदिन तोटा कमी होण्याचे नाव घेत नाही. यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी सिटीलिंक कंपनीने महापालिकेकडे २०२२-२३ या वर्षात ७० कोटी रुपयांची मागणी नोंदवली होती. महापालिकेने अंदाजपत्रकात ४५ कोटींची तरतूद केली होती.
दरम्यान, सिटी लिंक बससेवेच्या दैनंदिन उत्पन्न व खर्चाचा विचार केल्यास सोमवार, मंगळवार, बुधवारी या तीन दिवशी प्रति किलोमीटर ५२ ते ५३ रुपये उत्पन्न मिळते, तर गुरुवार, शुक्रवार, शनिवारी ४८ रुपये प्रतिकिमी उत्पन्न मिळते. सिटी लिंकच्या बसमधून दिवसाला सरासरी एक लाख तिकीटधारक प्रवासी प्रवास करतात तर २० हजार पासधारक विद्यार्थी प्रवास करतात.
यंदा ५५ कोटींचा तोटा?
केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम (एन-कॅप) अंतर्गत दोन टप्प्यात ५० इलेक्ट्रीक बसेस खरेदी करण्यासाठी महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यात पहिल्या टप्प्यात महापालिका २५ इलेक्ट्रिक बस खरेदी करणार आहे. या इ-बसच्या संचलनातून सिटीलिंकचा प्रति किलोमीटर खर्च ७५ वरून ६० रुपयांपर्यंत कमी होईल, असे सांगितले जात आहे. या वर्षात पूर्ण ५० बस खरेदी होणार नाहीत, तसेच नवीन २५ बस प्रत्यक्ष रस्त्यावर येण्यास किमान सहा महिने कालावधी लागू शकतो. याचा विचार केल्यास या आर्थिक वर्षाचा तोटा आणखी वाढून तो ५५ कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
...अशी आहे बस सेवा
महापालिकेकडील एकूण बस : २५०
रस्त्यावर धावतात : २४०
सीएनजी बस संख्या : १९४
डिझेल बस संख्या : ४६
अपेक्षित उपन्न : ८० रुपये प्रति किमी
प्रत्यक्ष उत्पन्न : ५० ते ५५ रुपये
तोटा : २५ रुपये प्रति किलोमीटर