नाशिक (Nashik) : स्मार्ट सिटिने हात वरती केल्याने आता महापालिकेने गोदेवरील जीर्ण रामसेतू पूल पाडून त्या ठिकाणी धनुष्य आकाराचा नवा पूल उभारणार आहे, तर तपोवनात हरिद्वार ऋषीकेशच्याच्या धर्तीवर हलता लक्ष्मण झूला बांधण्याची तयारी सुरू केली आहे. बांधकाम विभागाने या दोन्ही पुलांच्या कामांचा सिंहस्थ आराखड्यात समावेश केला आहे.
गंगा घाटावर पंचवटी व जुने नाशिक याना जोडणारा रामसेतू अनेक वर्षांपासून गोदावरीकच्या पुराचे धक्के सहन करीत आहे. यामुळे रामसेतू पुलाला तडे गेले आहेत. यामुळे पूल धोकादायक झाला आहे. स्मार्ट सिटिच्या स्ट्रक्चर ऑडिटमध्ये पुलाचा पाया भक्कम असला तरी सरफेस धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
स्मार्टसिटीने रामसेतूच्या जागेवर नवीन पूल उभारण्याचे नियोजन केले होते. मात्र, रामसेतू पूल पाडण्याला प्रचंड विरोध दर्शवला आहे. काही हेरीटेज प्रेमीनी हा पुरातन वारसा असल्याची ओरड करत पूल पाडण्यास विरोध दर्शवला. प्रत्यक्षात रामसेतू पुलाला कोणताही पुरातन वारसा नाही. वाढता विरोध पाहून स्मार्ट सिटिने या ठिकाणी नवीन पूल बांधण्यास हात वरती केली.
दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापुर्वी हा धोकादायक पाडून त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव बांधकाम विभागाने तयार केला असून त्याचा समावेश सिंहस्थ आराखड्यात करण्यात आला आहे. या ठिकाणी धनुष्य आकाराचा नवा पूल उभारणार असून त्यामुळे गोदेसह शहराच्या सौंदर्यात भर पडेल व पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्र ठरेल हा मुख्य उद्देश आहे.
तपोवनात लक्ष्मण झुला
तपोवनात गोदावरी व कपिला नदीचा संगम असून हा परिसर अतिशय मनोहर आहे. या ठिकाणी भाविकांसह पर्यटकांची नेहमी गर्दी असते. मनपा बांधकाम विभाग या ठिकाण हरिद्वार ऋषीकेशच्या धर्तीवर हलता लक्ष्मण झुला उभारणार आहे. सिंहस्थ आराखड्यात या पुलाचा समावेश आहे. यामुळे तपोवनात पर्यटनाला चालना मिळेल.